धुळे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील दिवंगत शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून धर्मा पाटील यांच्या पत्नी सखूबाई आणि मुलगा नरेंद्र या दोघांना दोंडाईचा पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले होते.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने अनेकांना नोटीसा बजावल्या होत्या. यात पाटील यांच्या कुटुंबीयांना सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं होतं.
दरम्यान, सरकारने आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही सर्व कुटुंब सामूहिक आत्महत्या करु, असा इशारा मंत्रालयात आत्म्हत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकरी धर्मा पाटील यांच्या पत्नी सखुबाई पाटील यांनी दिला होता.
मंत्रालयात धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली होती. ८५ वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना जमिनिच्या मोबदल्यापोटी ९ पट रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे धर्मा पाटील यांना त्यांच्या जमिनीचे ५४.४८ लाख रुपये मिळणार होते. पण अजूनही हा मोबदला त्यांच्या कुटुंबियांना मिळालेला नाही, असा आरोप मार्च महिन्यात करण्यात आला होता.
पाच एकर बागायती जमिनिसाठी फक्त ६ लाख रुपये देण्यात आले. मात्र, धर्मा पाटील यांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर धुळ्यातील विखरणमध्ये होऊ घातलेल्या वीज निर्मिती प्रकल्पासाठी संपादित १९९ एकर जमिनीचे पुनर्मूल्यांकन करण्यात आले. त्यानुसार मोबदल्याची मागणी करण्यात आली होती.