सटाण्यात 'दंगल' सिनेमाची खरी स्टोरी, लेकीसाठी वडिलांनी विकली शेतजमीन

सटाणा तालुक्यातल्या वायगावात लेकीला कुस्तीपटू बनवण्यासाठी शिवाजी अहिरे यांनी शेतजमीन विकली. 

Updated: Dec 26, 2018, 08:24 PM IST
सटाण्यात 'दंगल' सिनेमाची खरी स्टोरी, लेकीसाठी वडिलांनी विकली शेतजमीन title=

नीलेश वाघ / नाशिक : सटाणा तालुक्यातल्या वायगावात लेकीला कुस्तीपटू बनवण्यासाठी शिवाजी अहिरे यांनी शेतजमीन विकली. ऑलिम्पिकमध्ये लेकीने पदक जिंकावे ही वडिलांची इच्छा असून यासाठी तिच्या वडिलांची धडपड सुरु आहे.

मुली मुलांपेक्षा कमी नाहीत असं अभिमानाने शिवाजी अहिरे हे सांगतात. महावीर फोगट आणि त्यांच्या लेकी गीता-बबिता फोगट यांच्या जीवनावरील दंगल सिनेमा. आता पुन्हा एकदा प्रत्यक्ष जीवनात दंगल सिनेमाची कथा नाशिकच्या सटाण्यात घडलीय. 
 
आपल्या लेकीला आखाड्यात कुस्तीचे धडे वायगावमधील शिवाजी अहिरे हे वैशाली अहिरे हिला देत आहेत. दंगल सिनेमा पाहून शिवाजी अहिरे असे काही प्रेरित झाले की, त्यांनी आपल्या लेकीचं कुस्तीत करिअर घडवण्याचा निर्णय घेतला. वैशालीनेही आपल्या वडिलांना निराश केले नाही. शालेय, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धांमध्ये तिने चमकदार कामगिरी केली. मात्र वैशालीच्या प्रशिक्षणाचा खर्च पेलवत नसल्याने शिवाजी अहिरे यांनी त्यांची एक एकर जमीन विकली. 

वैशालीसह शिवाजी अहिरे यांची दोन मुलंही कोल्हापुरात कुस्तीचे प्रशिक्षण घेतायत. तिघांपैकी कुणीही देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकावं अशी वैशालीचे वडील शिवाजी आहिरे यांची इच्छा आहे. वडिलांनी शेतजमीन विकून केलेल्या त्यागाचा आपल्या अभिमान आहे, असे आवर्जुन कुस्तीपटू वैशाली सांगते. 

वैशाली सध्या दिल्लीत चंदगीराम आखाड्यात कुस्तीचे प्रशिक्षण घेतेय. नवीन तंत्र आत्मसात करण्यासाठी दिल्लीतील प्रीतमपुरात एफएफडब्ल्यूच्या मैदानातही धडे घेतेय. कुस्तीसह बॉक्सिंग, कराटेचंही तंत्र तिने आत्मसात केले आहे. आता वैशालीने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत देशाचं आणि वडिलांचं नाव उंचवावं यासाठी शुभेच्छा. तर लेकीच्या कुस्तीसाठी जमीन विकणाऱ्या शिवाजी अहिरे यांच्या त्यागालाही सलाम.