'पुन्हा येईन म्हटले नव्हते तरीही राहुल नार्वेकर पुन्हा आले!' फडणवीसांनी सांगितलं दोघांमधील साम्य, सभागृहात हशा पिकला

Devendra Fadanvis On Rahul Narvekar : सोमवारी राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकरांचे कौतुक करून अभिनंदन केलं. 

पुजा पवार | Updated: Dec 9, 2024, 01:46 PM IST
'पुन्हा येईन म्हटले नव्हते तरीही राहुल नार्वेकर पुन्हा आले!' फडणवीसांनी सांगितलं दोघांमधील साम्य, सभागृहात हशा पिकला title=
(Photo Credit : Social Media)

Maharashtra Assembly : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीला बहुमत मिळाल्यावर महायुतीचे सरकार स्थापन झालं. सरकार स्थापनेनंतर विधानसभा अध्यक्ष कोण होणार याची सर्वांनाच उत्सुकतता होती, मात्र रविवारी अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर सोमवारी राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकरांचे कौतुक करून अभिनंदन केलं, तसेच दोघांमधील साम्य सांगत असतानाच 'राहुल नार्वेकर पुन्हा येतील असं म्हटले नव्हते तरीही आले...' असे वक्तव्य केले. ज्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. 

नार्वेकरांविषयी काय म्हणाले फडणवीस? 

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मी विरोधी पक्षाचे देखील आभार मानतो की त्यांनी अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांच्या निवडीला समर्थन दिलं. विरोधी पक्षातल्या सदस्यांचे आणि नेत्यांचे मी आभार मानतो. आपल्याकडे विधानसभा अध्यक्ष बिनविरोध निवडण्याची परंपरा आहे आणि ही परंपरा यंदाही कायम राहिली'.   भाषणादरम्यान फडणवीसांनी नार्वेकर आणि त्यांच्यातील साम्य सांगत म्हटले की, मला आनंद आहे की राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री होते, तेव्हा त्या तिघांमधला एक वकील होता. मात्र आता तुमच्या रूपाने आणखीन एक वकील  विधानसभेत आहे.  'अध्यक्ष महोदय आपण मी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हता. तरीही आपण परत आलात याचा आम्हाला आनंद आहे. तुम्ही पहिलेच अध्यक्ष असाल जे पहिल्याच टर्ममध्ये विधानसभा अध्यक्ष झाले आणि त्यानंतर ते दुसऱ्यांदाही अध्यक्ष झाले. नाना पटोले यांचे विशेष आभार कारण त्यांनी वाट मोकळी करून दिल्याने नार्वेकर अध्यक्ष झाले'. 

'स्वतःच राष्ट्रीयत्व दाखवावं' लातूरच्या शेतकऱ्यांना नोटीस आल्याने राज ठाकरे संतापले, वक्फ बोर्डाला केले 'असे' आवाहन

मुख्यमंत्रांकडून राहुल नार्वेकरांची स्तुती : 

राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकरांच्या कारकिर्दीबाबत स्तुती केली. ते म्हणाले की, 'राहुल नार्वेकर यांनी विधानपरिषदेतही काम केलं आहे. अनेकदा कायद्यावर भाषण करताना राहुल नार्वेकर विधानपरिषदेचे सदस्य म्हणून बारकावे शोधून काढत त्यावर बोट ठेवण्याचं काम ते करत होते. कायदेमंडळाचा अध्यक्ष असल्यावर त्याला कायद्याचे बारकावे माहीत असणं महत्त्वाचं असतं. मागची पाच वर्षे संक्रमणाचा काळ होता. यात ज्या घडामोडी घडल्या त्यात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षांकडे माध्यमांचं लक्ष होतं. कदाचित यात सर्वाधिक चर्चेत राहिलेले राहुल नार्वेकरच होते. त्यांच्या रुपाने पुन्हा एकदा न्यायप्रिय आणि संयमी व्यक्तिमत्व निवडलं गेलं आहे ही आनंदाची बाब असल्याचं फडणवीस म्हणाले. 

महाराष्ट्राच्या जडणघडणीत अध्यक्षांचा मोठा वाटा : 

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, ' महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेक विधानसभा अध्यक्षांचा वाटा आहे या मांदियाळीत राहुल नार्वेकर यांचं नाव जोडलं जातं ही समाधानाची बाब आहे.  आपल्याला अडीच वर्षात एक अग्निपरीक्षाही द्यावी लागली. पण कोकणचा सुपुत्र 100 टक्के सोन्यासारखा आहे असं त्यातून बाहेर आल्यावर आपल्याला म्हणता येईल. मला वाटतं की एक अतिशय चांगल्या प्रकाराचं कार्य नार्वेकरांनी  केलं. पुन्हा अध्यक्ष होण्याचा मान आतापर्यंत केवळ चारच लोकांना मिळालाय. यात कुंदन फिरोदिया, सयादी सिलम, बाळासाहेब भारदे यांचा समावेश असून आता यात राहुल नार्वेकर यांच्या नावाचा देखील समावेश झाला आहे. यात बाळासाहेब भारदेनी विधानसभा अध्यक्षांनी कसं काम करावं हे दाखवून दिलं, असे यावेळी फडणवीस म्हणाले.