गुड न्यूज! 2 नवीन कोस्टल रोड प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार, नागरिकांचा प्रवास सोपा होणार

New Coastal Road Project in Mumbai: मुंबईत उड्डाणपुल आणि मेट्रोचे जाळे विणण्यात येत आहे. अशातच नवी मुंबईतही दोन प्रकल्प उभारण्यात येत आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 6, 2024, 04:16 PM IST
गुड न्यूज! 2 नवीन कोस्टल रोड प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार, नागरिकांचा प्रवास सोपा होणार  title=
CIDCO in India is set to begin work on two road projects Ulwe Coastal Road and Kharghar Coastal Road

New Coastal Road Project in Mumbai: मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होण्यासाठी व जलद प्रवासासाठी अलिकडेच मुंबईत अटल सेतूचे उद्घाटन पार पाडले. तर, एकीकडे सागरी किनारा रस्ता प्रकल्पदेखील 19 फेब्रुवारीरोजी नागरिकांसाठी खुला होणार आहे. मुंबईतील दोन महत्त्वकांक्षी प्रकल्प नागरिकांसाठी खुले होत असतानात नवी मुंबईतील दोन रस्ते प्रकल्पाच्या कामांना गती येणार आहे. या दोन प्रकल्पांमुळं नवी मुंबईतील वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. 

सिडकोकडून उलवे कोस्टल रोड (UCR) आणि खारघर कोस्टल रोड (KCR) या दोन रस्ते प्रकल्पांवर काम सुरू करण्यात येणार आहे. सहा पदरी उलवे कोस्टल रोड बांधण्यासाठी कंपनीला उच्च न्यायालयाकडून 3728 खारफुटी कापण्याची परवानगी मिळाली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यांतर निर्माणधीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. 

10 ऑगस्ट 2023 साली महाराष्ट्र कोस्टल झोन अथॉरिटीने या प्रकल्पाला मान्यता दिली होती. तर अलीकडेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडूनही या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. सर्व विभागाच्या मंजुरी प्राप्त झाल्यानंतर उच्च न्यायालयात अर्ज करुन खारफुटी हटवण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर आता न्यायालयाने या प्रकल्पासाठी मंजुरी दिली आहे. न्यायलयाने 3,728 खारफुटी कापण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळं या प्रकल्पाला आता गती येणार आहे.

उलवे कोस्टल रोड हा प्रकल्प नवी मुंबईसाठी महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प गेमचेंजर ठरणार आहे. तसंच, उलवे कोस्टल रोड मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला नवी मुंबई विमानतळाला जोडणार आहे. त्याचबरोबर 5.8 किलोमीटरचा हा मार्ग असून आमरा मार्गापासून सुरू होणार आहे. त्यानंतर शिवाजी नगर आणि उलवेच्या ट्रान्सहार्बर लिंक चौकात संपेल. या प्रकल्पासाठी एकूण  1,400 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसंच, हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 24 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. 

खारघर कोस्टल रोड 

सायन-पनवेल महामार्गावर खासघर ते सीबीडी बेलापूर, नेरुळ आणि सानपाडा या भागातील वाहतुक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. सिडको प्राधिकरण खारघर ते सीबीडी बेलापुरपर्यंक कोस्टल रोडचा प्रकल्प राबवत आहे. हा कोस्टल रोड प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर खारघर, तळोजा, कामोठेस कळंबोली आणि पनवेल शहरातील लोकांना मुख्य सायल-पनवेल महामार्ग वगळता. सीबीडी बेलापूर आणि वाशीमार्गाने मुंबईत येऊ शकतात. खारघर सेक्टर 34 ते खारघर सेक्टर 16मध्ये असलेल्या स्पेगटी संकुलपर्यंत चार पदरी मार्ग तयार होणार आहे. मात्र हा प्रकल्प सध्या MoEFCCच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. 2026 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.