संभाजीनगर : राज्याच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहे. औरंगाबाद (Aurangabad) येथून थेट मुख्यमंत्री दिल्लीला (Delhi) रवाना झाले आहेत. त्यामुळे दिल्लीत मंत्रीमंडळ विस्तार आणि शिवसेनेसोबत सुरु असलेल्या न्यायालयीन लढ्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन महिना उलटला तरी राज्यात मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रीमंडळ विस्तार रखडल्यामुळे वैजापूर येथील सभा आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबादवरुन थेट दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री झाल्यापासून सहावा दिल्ली दौरा
एकनाथ शिंदे हे गेल्या महिन्याभरात आतापर्यंत पाचवेळा दिल्लीला जाऊन आले आहेत. मात्र अद्यापही राज्यात मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. त्यानंतर आता राज्यभरात दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दिल्लीला रवाना झाल्याने पुन्हा मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे या दौऱ्यामध्ये मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.