छत्रपती संभाजीनगर हादरलं! चिमुकल्या मुलीसह आई वडिलांचा राहत्या घरात सापडला मृतदेह

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. एकाच कुटुंबातील तिघांचेही मृतदेह राहत्या घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र तिघांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही

आकाश नेटके | Updated: May 19, 2023, 01:09 PM IST
छत्रपती संभाजीनगर हादरलं! चिमुकल्या मुलीसह आई वडिलांचा राहत्या घरात सापडला मृतदेह title=

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (chhatrapati sambhaji nagar) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. मृतांमध्ये पती पत्नी आणि चिमुकल्या मुलीचा समावेश असल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Sambhaji Nagar Police)  घटनास्थळी धाव घेतली असून तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

संभाजी नगरच्या सातारा परिसरातील वळदगाव मध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांनी गळफास घेतला आहे. पती पत्नी आणि त्यांच्या चार मुलीचा मुलीचा मृतदेह राहत्या घरी आढळून आला आहे. तिघांचेही मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. मोहन प्रताप डांगर (28), पूजा मोहन डांगर (24) आणि श्रेया मोहन डांगर (4) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी छत्रपती संभाजी नगर शहरातील सातारा पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकते नसले तरी यामागे घातपाताचा देखील संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र एकाच कुटुंबातील 3 जणांनी गळफास घेतल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वळदगावमध्ये उपसरपंच संजय झळके यांच्या घरी डांगर कुटुंबिय भाड्याने राहत होते. गुरुवारी रात्री या दाम्पत्यामध्ये भांडण झाले. यानंतर त्यांनी आधी मुलीला गळफास देऊन आणि नंतर पती पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. शुक्रवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून सातारा पोलिसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली. या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणाची माहिती डांगर कुटुंबियांना दिली आली. घरगुती वादातून हे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पती पत्नीची धरणात उडी घेऊन आत्महत्या

अमरावती जिल्ह्यातील धारणी मार्गावरील वझ्झर येथील सापन धरणात एका जोडप्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विकी बारवे (23) व तुलसी बारवे (21) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.  गेल्या दोन दिवसांपासून ते गावातून बेपत्ता होते. प्राथमिकदृष्ट्या दोघांनी आत्महत्येचा केल्याचा अंदाज आहे. गुरुवारी सकाळी सापन धरणाच्या जलक्षेत्रात सकाळच्या सुमारास दोघांचेही मृतदेह तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली होती.