कोणाची दृष्ट लागली? लग्नाला वर्षही पूर्ण होत नाही, तोच धरणात आढळला पती-पत्नीचा मृतदेह, अमरावतीत खळबळ

Amravati Crime News : धरणाच्या पाण्यात जोडप्याचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या सापन धरण परिसरात सातत्याने असे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या परिसरात सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी केली जात आहे.

आकाश नेटके | Updated: May 19, 2023, 11:18 AM IST
कोणाची दृष्ट लागली? लग्नाला वर्षही पूर्ण होत नाही, तोच धरणात आढळला पती-पत्नीचा मृतदेह, अमरावतीत खळबळ title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावती जिल्ह्यातून (Amravati crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी मार्गावरील वझ्झर येथील सापन धरणात (sapan dam) पती-पत्नीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. धरण परिसरातून मॉर्निंग वॉकला निघालेल्या लोकांना या जोडप्याचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले होते. त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी (Amravati Police) घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालायत पाठवण्यात आले आहेत.

विकी बारवे (23) व तुलसी बारवे (21) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. विकी हा ट्रॅक्टरवर चालकाचे काम करत होता. 
 चिखलदरा तालुक्यातील चिचखेडा येथील हे जोडपे मंगळवारी दुपारी दुचाकीने घरातून निघाले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून ते गावातून बेपत्ता होते. प्राथमिकदृष्ट्या दोघांनी आत्महत्येचा केल्याचा अंदाज आहे. मात्र पोलीस मृत्यूच्या कारणांचा तपास घेत आहेत. घटनास्थळी दुचाकी आढळून आली असून दोघेही दुचाकीने आल्याचे स्पष्ट झाले आहे. विकी व तुलसी दोघांचाही प्रेमविवाह झाला होता.

गेल्या दोन दिवसांपासून विकी आणि तुलसीचा शोध सुरु होता. मात्र गुरुवारी अचलपूर तालुक्यातील वझ्झर गावानजीक असणाऱ्या सापन धरणाच्या जलक्षेत्रात सकाळच्या सुमारास दोघांचेही मृतदेह तरंगताना आढळून आले. दोघांचेही मृतदेह वर काढल्यानंतर ते विक्की आणि तुलसी यांचेच असल्याचे स्पष्ट झाले. अकरा महिन्यांपूर्वीच दोघांचा प्रेमविवाह झाला होता. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह अचलपुरच्या उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी यानंतर आजूबाजूच्या परिसराची तपासणी केली असता त्यांन एक बाईक आढळून आली. विकीने हे बाईक मंगळावारीच त्याच्या नातेवाईकांकडून घेतली होती.

दुसरीकडे, दोघेही घरी न परतल्याने विक्कीच्या भावाने त्याला फोन केला होता. त्यावेळी विक्कीचा मोबाईल घटनास्थळावरील एका महिलेला सापडला. त्यावेळी हा मोबाईल सापड्याची माहिती त्या महिलेने दिली. 

दरम्यान, विक्कीच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले होते. विक्की ट्रॅक्टर चावण्यासोबत दोन एकरात शेती देखील करत होता. विक्की त्याचा भाऊ, आई आणि पत्नीसह राहत होता. त्यांच्यात घरात कुठलाही कौटुंबीक वाद नव्हता. मात्र तरीही त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले याबाबत गावकऱ्यांमध्येही चर्चा सुरु आहे.

गेल्यावर्षीही आढळले होते मृतदेह

गेल्या वर्षीही सापन धरणाच्या जलाशयात होमगार्ड तरुणीसह दोन युवतींचे मृतदेह आढळले होते. या दोन्ही मुली परतवाडाच्या कांडली येथील होत्या. गायत्री पडोळे आणि हेमलता पाटे अशी त्यांची नावे होती. त्यांच्या कुटुंबियांनी दोघेही हरवल्याची तक्रार दाखल केली होती. गायत्री ही होमगार्ड होती. तर या दोघीही पोलीस भरतीची तयारी करत होत्या.