चंद्रपुरात होम क्वारंटाईन केलेल्या लोकांना GPS ट्रॅकर लावणार?

अनेक रुग्ण सार्वजनिक ठिकाणी बिनधास्त फिरताना आढळून आले होते.  

Updated: Mar 23, 2020, 03:58 PM IST
चंद्रपुरात होम क्वारंटाईन केलेल्या लोकांना GPS ट्रॅकर लावणार? title=
संग्रहित छायाचित्र

चंद्रपूर: कोरोना व्हायरसचा (COVID-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, या सरकारच्या आवाहनला नागरिकांकडून वाटाण्याच्या अक्षता लावल्या जाताना दिसत आहेत. एवढेच नव्हे तर राज्यभरात अनेक ठिकाणी परदेशातून परतल्यामुळे होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना दिलेले अनेक रुग्ण सार्वजनिक ठिकाणी बिनधास्त फिरताना आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर आता चंद्रपूरात प्रशासनाकडून एक मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार जिल्ह्यातील होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांना GPS ट्रॅकर लावले जाऊ शकते. जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवणे सोपे होईल.

चंद्रपूरात होम क्वारंटाईन कलेले अनेक लोक बाहेर फिरताना आढळून आले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासन या लोकांना जीपीएस ट्रॅकर लावण्याचा विचार करत असल्याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. 

काही दिवसांपूर्वीच मुंबईतही होम क्वारंटाईन केलेले लोक पश्चिम रेल्वेने प्रवास करताना आढळून आले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. सरकारने वारंवार आवाहन करूनही नागरिक COVID-19 चे संकट गांभीर्याने घ्यायला तयार नाही. काल जनता कर्फ्युच्यावेळी नागरिकांनी बऱ्यापैकी बाहेर पडण्यावर संयम ठेवला होता.

 

मात्र, आज सकाळपासून पुन्हा एकदा नागरिक रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. मुंबई, पुणे, ठाणे आणि डोंबिवली या शहरी भागातही लोक साध्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. कलम १४४ लागू करूनही लोक बाजारपेठांमध्ये गर्दी करत आहेत. तसेच खासगी वाहनांनी बिनधास्त फिरत आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारकडून आणखी कडक निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे. राज्यभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ८९ वर पोहोचली आहे.