शिवरायांच्या मावळ्यावर असे आरोप लावले याचं वाईट वाटतंय, चंद्रकांत पाटील यांचा जाहीर माफीनामा!

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरूषांबाबत केलेल्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफी मागितली आहे. याबाबत एक पत्र प्रसिद्ध केलं आहे.

Updated: Dec 12, 2022, 07:14 PM IST
शिवरायांच्या मावळ्यावर असे आरोप लावले याचं वाईट वाटतंय, चंद्रकांत पाटील यांचा जाहीर माफीनामा!  title=

Apology of Chandrakant Patil : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरूषांबाबत केलेल्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आंबेडकरवादी संघटना मोर्चे काढत आहेत. पाटील यांनी या वादग्रस्त वक्तव्यावर दिलगीरी व्यक्त केली होती. तरीही पुण्यात त्यांच्यावर शाईफेक झाली होती. अखेर पुन्हा पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफी मागितली आहे. याबाबत एक पत्र प्रसिद्ध केलं आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील? 

माझा कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता, महापुरूषांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत. शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत याचे वाईट वाटत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असे मला वाटत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

माझी कोणाविषयीही तक्रार नाही, कोणाला अटक करण्यात आली असेल तर त्याची मुक्तता करावी. ज्या पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे तेही मागे घ्यावं. पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना करतो. माझ्यावर शाईफेक करणाऱ्यांबद्दल मला काहीही बोलायचं नसून माझ्या दृष्टीने या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा ही विनंती, असं पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी पुण्यातील पिंपरी येथे शाई फेक झाली. पाटील यांनी पैठणमधील कार्यक्रमामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. 

चंद्रकांत पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य
सरकारवर अवलंबून का राहताय? कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी या देशात शाळा सुरु केल्या. या सर्वांना शाळा सुरु करताना सरकारने अनुदान नाही दिलं. यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरु करायचीय आम्हाला पैसे द्या. तेव्हा 10 रुपये देणारे होते. 10 कोटी देणार लोक आहेत ना, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते