निलेश वाघ, झी मीडिया, नाशिक : राग अनावर झाल्यावर कोण कोणत्या थराला जाईल याचा काही अंदाज बांधता येत नाही. रागाच्या भरात केलेल्या कृत्याची आयुष्यभरासाठी शिक्षा होऊन जाते. असाच काहीसा प्रकार नाशिकमध्ये (Nashik Crime) घडलाय. आई वडिलांसोबत भांडणाऱ्या मेव्हण्याला समजवायला गेलेल्या बहिणीच्या नवऱ्याने कायमचं शांत केले आहे. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला होता. मात्र पोलिसांनी (Nashik Police) काही तासांमध्येच आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी एका शाळेत मुख्याध्यापक असल्याचे समोर आले आहे. नाशिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
वाल्मीक साहेबराव ठाकूर असे मृत मेव्हण्याचे नाव आहे. तर ईश्वर ठाकूर असे आरोपीचे नाव आहे. वाल्मीक ठाकूर दारू पिऊन आई-वडिलांना नेहमी त्रास देत असल्याच्या कारणाने ईश्वर ठाकूर याने त्याची निर्घृणपणे हत्या केली. मंगळवारी रात्री नांदगावमधील आनंदनगर भागात ही घटना घडली. आरोपी ईश्वर ठाकूर नगरपालिका शाळेत मुख्याध्यापक असल्याचे समोर आले आहे. आरोपी ईश्वर ठाकूर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वाल्मीक साहेबराव ठाकूर हा सुरत येथे नोकरी करत होता. काही दिवसांपूर्वी तो नांदगाव येथे घरी आला होता. वाल्मीक ठाकूरला दारुचे व्यसन होतं. दारूच्या नशेतच त्याने आई-वडिलांना मारहाण केली आणि घराबाहेर काढलं. ही गोष्ट कळताच ईश्वर देवराम ठाकूर व चुलतभाऊ प्रदीप निवृत्ती ठाकूर यांनी वाल्मीकच्या घराकडे धाव घेतली आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता.
वाल्मिकला समजवण्याच्या प्रयत्नात त्याची ईश्वरसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर ईश्वर ठाकूरने मी याला माझ्या पद्धतीने समजावतो असे प्रदीप ठाकूरला सांगितले. त्यानंतर प्रदीप ठाकूर शेजारच्या घरात निघून गेला. मात्र लगेचच त्याला वाल्मिकचे आई वडील ओरडत असल्याचे ऐकू आले. त्यानंतर प्रदीप ठाकूरने वाल्मिकच्या घराकडे धाव घेतली तेव्हा त्याला धक्का बसला. आरोपी ईश्वर ठाकूर हा वाल्मीक ठाकूर याच्या डोक्यावर व पायावर हातोड्याने घाव घालत असल्याचे प्रदीपने पाहिले.
या सर्व प्रकारानंतर आरोपी ईश्वर ठाकूरने याबद्दल कुणाला सांगितले तर तुझी पण अशीच अवस्था करेल अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला. या धक्कादायक प्रकारानंतर सावरत प्रदीप ठाकूर यांनी वाल्मिकला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर प्रदीप ठाकूर याने नांदगाव पोलीस ठाण्यात या सर्व प्रकाराबाबत तक्रार दिली.
दरम्यान, हत्येनंतर फरार झालेल्या ईश्वर ठाकूरला नांदगाव पोलिसांनी काही तासांत अटक करून त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.