सगळंच केंद्र सरकार करणार मग तुम्ही काय करणार?- मेटेंची चव्हाणांवर टीका

केंद्राची भूमिका आरक्षणाच्या बाजूची आहे. असं असताना महाविकास आघाडी सरकार चुकीची माहिती देत होतं. काल सर्वोच्च न्यायालयात केंद्राने याचिका दाखल केल्यामुळे राज्य सरकार तोंडावर पडले आहे. अशी टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे.

Updated: May 14, 2021, 03:48 PM IST
सगळंच केंद्र सरकार करणार मग तुम्ही काय करणार?- मेटेंची चव्हाणांवर टीका title=

पुणे : केंद्राची भूमिका आरक्षणाच्या बाजूची आहे. असं असताना महाविकास आघाडी सरकार चुकीची माहिती देत होतं. काल सर्वोच्च न्यायालयात केंद्राने याचिका दाखल केल्यामुळे राज्य सरकार तोंडावर पडले आहे. अशी टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे.

'अशोक चव्हाणांनी केंद्राचे आभार मानायला पाहिजे. परंतु ते नाचत येईना अंगण वाकडे असे वागत आहेत. केवळ आरोप करत आहेत. आता 50 टक्के मर्यादेचा केंद्राने याचिकेत समावेश करावा असे म्हणतात. सगळंच केंद्र सरकार करणार मग तुम्ही काय करणार? असा सवाल देखील त्यांनी केलाय.

'न्यायालयाचा निकाल येताच EWS चे आरक्षण लागू करायला पाहिजे होतं. आणखीही वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरेंनी जे त्यांच्या हातात आहे ते करावं. सरकार तोंडावर कुलूप लावक्यावसारखं गप्प बसलंय. सरकारमधील लोक नाकर्ते आहेत, ते फक्त खुर्च्या उबवत आहेत.' अशी टीका ही त्यांनी केली आहे.

'आघाडी सरकारच्या मनात पाप आहे. मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही अशी त्यांची वृत्ती आहे. या सगळ्याला जेवढे अशोक चव्हाण जबाबदार आहेत, त्यापेक्षा जास्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. जर राज्य सरकार काही करत नसतील तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत.' असं देखील विनायक मेटेंनी म्हटलं आहे.

'मराठा समाजातील असंतोष दडपण्यासाठी लॉक डाऊन वाढवला आहे. मात्र आम्ही लवकरच रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत. बीडहून मोर्चा काढणार आहोत. राज्यातील मंत्र्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. मराठा समाजाच्या तरुणांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम आघाडी सरकार करत आहे. त्यासाठी पगारी माणसं ठेवण्यात आली आहेत.' असा आरोप देखील मेटेंनी केला आहे.