इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल, कोर्टात खटला सुरू

इंदुरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्या

Updated: Jun 26, 2020, 05:39 PM IST
इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल, कोर्टात खटला सुरू title=

प्रशांत शर्मा, झी मीडिया, अहमदनगर : पुत्रप्राप्तीबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराज सध्या अडचणीत सापडले आहेत. इंदुरीकरांविरोधात पीसीपीएनडीटी अंतर्गात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा खटला देखील संगमनेर कोर्टात सुरू झाला आहे. 

इंदुरीकर महाराजांनी एका किर्तनावेळी पुत्रप्राप्तीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. याप्रकणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सचिव रंजना गवांदे यांनी खटला दाखल करण्यासाठी पाठपुरावा केला होता. दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या तृत्पी देसाई यांनीही या कारवाईचं स्वागत केलं आहे. सत्याच्या विजय झाल्याची प्रतिक्रिया तृत्पी देसाई यांनी दिली आहे.

इंदुरीकर महारांजवर दाखल झालेल्या या खटल्यात ते दोषी आढळले तर त्यांना ३ वर्षांचा तुरुंगवास आणि १० वर्षांचा दंड होऊ शकतो. संत परंपरेचा प्रबोधनाचा वारसा सांगणाऱ्या इंदुरीकर महाराजांच्या एका वक्तव्यामुळे त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. 

सम तिथीला स्त्री सोबत संग झाला, तर मुलगा होतो आणि विषम तिथीला संग केला तर मुलगी होते, असं इंदुरीकर महाराज म्हणाले होते. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. वाद वाढल्यानंतर इंदुरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केली होती. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आपला उद्देश नव्हता, पण भावना दुखावल्या असल्यास आपण मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, असं स्पष्टीकरण इंदुरीकर महाराजांनी दिलं होतं.