सावधान, रक्ताच्या नात्यांमध्ये विवाह केला तर...

 रक्ताची नाती हीच खरी नाती, असे मानले जाते. पण रक्ताच्या नात्यांमध्ये विवाह केला तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. तुमचाही रक्ताच्या नात्यामध्ये विवाह झाला असेल तर सावधान. 

Updated: Aug 24, 2017, 11:23 PM IST
सावधान,  रक्ताच्या नात्यांमध्ये विवाह केला तर... title=

शशिकांत पाटील/ लातूर : रक्ताची नाती हीच खरी नाती, असे मानले जाते. पण रक्ताच्या नात्यांमध्ये विवाह केला तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. तुमचाही रक्ताच्या नात्यामध्ये विवाह झाला असेल तर सावधान. तुमचीही गत लातूरच्या पेटकर कुटुंबियांसारखी होऊ शकते.

लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातल्या चापोली गावातील हे पेटकर कुटुंबीय. गेल्या तीन पिढ्यांपासून अचानक येणाऱ्या अंधत्वामुळं हे कुटुंब मोठ्या संकटात सापडलंय. कुटुंबप्रमुख असलेल्या ६५ वर्षीय सुलुबाई पेटकर. त्यांचे वडील पांडुरंग पेंडलवार यांनाही असंच अचानक अंधत्व आलं होतं. सुलुबाईंचं लग्न कुमठा गावातील पांडुरंग पेटकर यांच्याशी झालं. लग्नानंतर मीना आणि नामदेव ही दोन अपत्य होईपर्यंत सुलुबाईंना स्पष्ट दिसत होतं. मात्र नंतर त्यांनाही अचानक अंधत्व आलं. 

सुलुबाईंची मोठी मुलगी मीना हिला लग्नानंतर दोन वर्षांतच अंधत्व आलं. तेव्हा तिच्या नवऱ्याने तिला माहेरी आणून सोडलं. सुलुबाईंचा मुलगा नामदेव यालाही आई आणि बहिणीप्रमाणं अचानक अंधत्व आलं. एखाद्या चित्रपटातल्या शापित कुटुंबासारखी दृष्टीहीन होणाऱ्या पेटकर कुटुंबाची ही कहाणी डोळे विस्फारून टाकते.

अचानक आलेल्या अंधत्वामुळं पेटकर कुटुंब तणावाखाली आहे. घरात तीन आंधळी माणसं. धुणीभांडी करून कुटुंबाला जगवण्याची वेळ त्यांच्यावर आलीय. साडेतीन एकर शेती आहे, पण ती बटईनं दिलीय. त्यातून मिळणा-या धान्यामुळं कशीबशी गुजराण होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंग भिकाने यांनी सध्या या पेटकर कुटुंबाचं पालकत्व स्वीकारलंय. मुंबईतील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे ते पेटकर कुटुंबियांना घेऊन जाणारायत... कुटुंबात नात्यांमध्ये लग्न झालं असेल तर अशा पद्धतीचं कायमस्वरूपी अंधत्व येतं. त्यावर जगात कुठलाही उपचार नसल्याचं नेत्र तज्ज्ञांचं मत आहे.

पेटकर कुटुंबियांपैकी अनेकांची लग्नं रक्ताच्या नात्यांमध्येच झालीत. सुलुबाईंनी आपल्या मामांशी लग्न केलं होतं. सुलुबाईंच्या मुलीचं मीनाचं लग्न देखील चुलत मामासोबत झालं होतं. त्यामुळंच असं अंधत्व आल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं रक्ताच्या नात्यात लग्न करणाऱ्यांनो, वेळीच सावधान व्हा.