रत्नागिरीत अपघात, तीन वेळा पलटून बस दरीत कोसळली

संगमेश्‍वरमधल्या नायरी -निवळी घाटात हा अपघात झाला. 

Updated: Dec 28, 2018, 12:53 PM IST
रत्नागिरीत अपघात, तीन वेळा पलटून बस दरीत कोसळली title=

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील नायरी - निवळी घाटात एसटी बसचा भीषण अपघात झालाय. अपघाताची माहिती मिळताच बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झालीय. धक्कादायक म्हणजे, रस्ता सोडलेली ही बस तीन वेळा पलटून दरीत कोसळल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिलीय. दरीतून अपघातग्रस्तांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेत. संगमेश्वर तालुक्यात एसटी बसला झालेल्या अपघातात २३ जण जखमी झाले असून यातील एक महिला गंभीर जखमी झाली आहे, तिला पुढील उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आलं आहे. सुरेखा सुरेश झोरे असं या गंभीर जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे. संगमेश्‍वरमधल्या नायरी -निवळी घाटात हा अपघात झाला. 

निवळी इथं वस्तीला असणारी एसटी बस आज सकाळी पावणे सातच्या सुमारास डेपोकडे येत असताना कापाच्यावाडी जवळील नायरी निवळी घाटामध्ये अपघात झाला. यावेळी गाडी तीन वेळा उलटली. यावेळी गाडीत २८ प्रवाशी असल्याची माहिती मिळाली आहे. २८ पैंकी २३ प्रवासी जखमी झाले असून यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

दरम्यान अपघाताची माहिती कळताच अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीना स्थानिकांच्या रिक्षातून तसंच रुग्णवाहिकेतून संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील सुरेखा सुरेश झोरे यांच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभिर दुखापत झाल्यानं त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी इथं हलवण्यात आलंय. चालकाचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.