होळीच्या वर्गणीसाठी मुलांनी घराचं दार ढकललं, आणि समोर मृतदेह पाहून हादरले

विरारच्या अर्नाळा परिसरातील धक्कादायक घटना, पोलिस याप्रकरणी आरोपीचा शोध घेत आहेत

Updated: Mar 17, 2022, 01:22 PM IST
होळीच्या वर्गणीसाठी मुलांनी घराचं दार ढकललं, आणि समोर मृतदेह पाहून हादरले title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार :  होळीची वर्गणी गोळा करण्यासाठी गेलेल्या तरुणांना घरात एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना विरारच्या अर्नाळा परिसरात उघडकीस आली आहे.

निर्जला इन्द्रेश कुमार असं हत्या झालेल्या महिलेचे नाव असून तिच्याच पतीने तिची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली असून तो बिगारी कामगार आहे. 

अर्नाळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात कारणावरून बिगारी काम करणाऱ्या तिच्या पतीनेच धारधार शस्त्राचा वापर राहत्या घरात तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने आपल्या तीन आणि पाच वर्षाच्या दोन मुलींना सोबत घेऊन पलायन केलं.

काल रात्री होळी सणा निमित्त वर्गणी काढण्यासाठी गावातील तरुण घरोघरी फिरत होते याच दरम्यान त्यांना या दाम्पत्याच्या घरातून कुजलेला वास आला व त्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आलं.

अर्नाळा सागरी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपासासाठी पाठवून दिला असून फरार झालेल्या आरोपी पतीवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.