नागपूर : गोवा निवडणुकीत भाजपाला यश मिळवून देणाऱ्या भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी 'गोवा तो एक झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है' म्हणत महाराष्ट्रात एक हाती सत्ता आणणारच असा निर्धार व्यक्त केला.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, 'देशात मोदींचे नेतृत्व अडचणी दूर करू शकतो ही सामान्य जनतेची भावना आहे. निवडणूक आल्या तेव्हा काही जण म्हणत होते. आता भाजपची चलती आहे. मतदानानंतर यांच्या हातून उत्तरप्रदेश गेलं. उत्तराखंड गेलं, गोवा गेलं. पण, त्यांची स्वप्ने ही मुंगेरीलाल के हसीन सपने सारखीच राहिली आहे.'
गोवा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी यांनी रणभेदी गर्जना केली की आम्हीच निवडून येणार. आमची लढाई ही शिवसेना किंवा राष्ट्रवादी यांच्याशी नाही तर नोटाशी होती. पण, दोन्ही पक्ष मिळूनही या निवडणुकीत त्यांना नोटापेक्षाही कमी मत मिळाली.
महाराष्ट्रातही आता परिवर्तनाची लाट सुरु झालीय. सरकारच्या भ्रष्ट्राचारविरोधी लढ्यात आता भाजपसोबत जनताही उतरली आहे. आम्ही सरकारचा भ्रष्ट्राचारी बुरखा टराटरा फाडत आहोत. हे सरकार महाविकास आघाडी सरकार नाही तर महावसुली सरकार आहे. या सरकारमधील दोन मंत्री जेलमध्ये आहेत.
भ्रष्ट्राचारविरोधातील लढाई आता एका शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांविरोधात खोट्या केसेस टाकणे सुरु आहे. प्रवीण दरेकर यांना फसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, कितीही खोट्या केसेस टाकल्या तरी भ्रष्ट्राचार बाहेर काढणे थांबणार नाही. तुमचा चेहरा जनतेसमोर आणल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा देतानाच महाराष्ट्रात एक हाती सत्ता आणणारच, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.