वाचन गोडी लागावी म्हणून... पुस्तकांनी केली आईची तुला

वाचाल तर वाचाल, असं कायमच म्हटलं जातं. वाचनाची गोडी लागावी म्हणून..

Updated: Jun 2, 2019, 09:38 PM IST
वाचन गोडी लागावी म्हणून... पुस्तकांनी केली आईची तुला title=
आईच्या वाढदिनी केली पुस्तक तुला.

मुंबई : वाचाल तर वाचाल, असं कायमच म्हटलं जातं. मात्र, त्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. मात्र, माध्यमिक शिक्षकाने असा एक प्रयत्न करुन पाहिला आहे. या शिक्षकानं वाचनाची गोडी लागावी म्हणून, पुस्तकांनी आईची तुला केली. तुला केलेली ही पुस्तके या शिक्षकानं आश्रम शाळेला भेट दिली. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा मठ येथे हा वेगळा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न झाला. निमित्त होतं ते त्यांच्या आईच्या ८५ व्या वाढदिवसाचे. आज स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानाच्या युगात अनेकांचे वाचन कमी झालेले आहे. त्यात आता भर पडली आहे ती स्मार्टफोनची. त्यामुळे तरुणपिढी ही जास्त वेळ मोबाईलमध्ये व्यस्त असते. पूर्वी पालक, शिक्षक मुलांना वाचनाची गोडी लागवी म्हणून वेगवेगळी पुस्तके शालेय मुलांना वाचण्याचा आग्रह करताना दिसायची. मात्र, सध्या अनेकांचा वाचनाचा कल थोडा कमी होताना दिसत आहे. कारण आता सर्व काही इंटरनेटवर उपलब्ध असल्याने तरुणांची ओढ तिकडेच असते. 

इंटरनेटच्या जमान्यात पुस्तकांचे महत्व तेवढेच अबाधीत आहे. पुस्तकांचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक जण आपापल्यापरीने कार्य करत असतात. एका माध्यमिक शिक्षकाने आईच्या वाढदिवशी तिची पुस्तकांनी तुला केली. लांजा मठ येथील माध्यमिक शाळेवर शिक्षकपदावर कार्यरत असणारे संतोष कांबळे यांच्या मातोश्री इंदिरा कांबळे यांचा नुकताच ८५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून त्यांनी आईची पुस्तकांना तुला केली. 

माजी मंत्री रवींद्र माने यांच्या हस्ते ही तुला करण्यात आली. यावेळी शिवसेना आमदार राजन साळही हे देखील उपस्थित होते. तुला झाल्यानंतर ही पुस्तके येथील आश्रम शाळेला भेट देण्यात आली. कांबळे कुटुबीयांनी घेतलेल्या या आदर्शवत निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.