'मेगा'भरती ही भाजपची चूक - चंद्रकांत पाटील

भाजपच्या मूळ संस्कृतीला धक्का 

Updated: Jan 18, 2020, 08:15 AM IST
'मेगा'भरती ही भाजपची चूक - चंद्रकांत पाटील  title=

पिंपरी-चिंचवड : विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने केलेली मेगाभरती ही चूकच अशी कबुली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. भाजपच्या मूळ संस्कृतीला मेगाभरतीचा फटका बसल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या मेळाव्यात कबुल केलं आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने केलेली मेगाभरती ही सगळ्याच राजकीय पक्षांना हादरे बसवणारी होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. याचाच फटका भाजपला बसल्याचं पाटील म्हणाले.

मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती थोडी बिघडली. भाजपची संस्कृती अशी नव्हती. हा पक्ष प्रेमावर चालतो. पण थोडा बदल झाला. जो काम करतो त्याला नाही तर तो आपल्या जवळ आहे त्याला पदं दिली गेलीत. हे कल्चर आता उद्धवस्त करावं लागणार आहे, असं देखील पाटील यावेळी बोलले. 

चंद्रकांत पाटील यांनी या मेळाव्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. शक्तीसंचय करण्यासाठी इतर पक्षातील दिग्गज नेते आपल्या पक्षात घ्यावे लागतात असा दावा माजी मुख्यमंत्र्यांनी केला होता. पण हा दावा निकालानंतर फेल ठरल्याच समोर आलं. त्यामुळे भाजपला मेगाभरती फायद्याची ठरली नाही हे सिद्ध झालं. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.