Ganpat Gaikwad Shooting Sharad Pawar Comment: भारतीय जनता पार्टीचे कल्याण पूर्व मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटातील माजी नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबारासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. 'राज्यात सत्तेचा गैरवापर होतोय, हे चिंताजनक आहे,' असं पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणावर भाष्य केलं आहे. (गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबार प्रकरणाचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
पत्रकारांनी शरद पवारांना या घटनेसंदर्भात प्रश्न विचारला असता शरद पवारांनी, "सत्तेचा गैरवापर केला जातोय हे दिसून येते. गोळीबाराची घटना व्हायला लागली आणि राज्य सरकार या सगळ्याबाबतीत बघ्याची भूमिका घेणार असेल तर राज्य आज कोणत्या दिशेने चाललंय त्याचे हे एक उदाहरण आहे," असं मत नोंदवलं. "राज्यात अशा गोष्टी घडत आहेत ते महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने चिंताजनक आहे," असंही शरद पवारांनी सांगितले आहे.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही उल्हासनगर प्रकरणावरुन सरकारवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. "राज्यभरात मागील काही दिवसांपासून गुन्हागारीचे प्रमाण वाढले आहे. मी अधिवेशनातही याबाबत बोललो होतो. मात्र आजही परिस्थिती जैसे थेच दिसत आहे. पुण्यात दिवसाढवळ्या कोयता गँगचा उच्छाद सुरु आहे. हत्या होत आहेत. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्येही कधी हत्या होते तर कधी गोळीबार होतोय," असं जयंत पाटील म्हणाले. उल्हासनगर प्रकरणाबद्दल बोलताना जयंत पाटलांनी, "मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात उल्हासनगरमध्ये घडलेली फायरिंगची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आमदारांनीच पोलिसांसमोर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करावा हे अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रात या पूर्वी असे कधी घडत नव्हते," असं म्हटलं.
नक्की वाचा >> '..तर बाप म्हणून जगण्यात अर्थ नाही'; फडणवीसांबद्दल बोलताना गोळीबार करणाऱ्या BJP आमदाराचं विधान
"आपले महाराष्ट्र राज्य साधुसंतांची भूमी म्हणून ओळखले जाते. आता तेच राज्य गुन्हेगारांचा अड्डा म्हणून ओळखला जावू नये ही भीती आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना नेमके कोण पाठीशी घालत आहे असा मोठा प्रश्न आज राज्यातील सर्व सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. कुठे नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र माझा?" असा सवाल जयंत पाटलांनी विचारला आहे.
नक्की वाचा >> 'शिंदेंनी भ्रष्टाचाराचे किती पैसे खाल्ले विचारा, माझे कोट्यवधी रुपये..'; BJP MLA कडून CM च्या राजीनाम्याची मागणी
या हल्ल्यानंतर आपणच गोळीबार केल्याची कबुली देताना आमदार गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये आमच्यासारख्या सामान्य माणसाला आरोपी बनवत आहेत, असं आमदार गायकवाड यांनी 'झी 24 तास'कडे नोंदवलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.