मुंबई : आज रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि भाजपच्या कोर टीममधील काहींची बैठक वर्षावर होणार आहे. आत्तापर्यंत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांसह अर्थ, महसूल, नगरविकास अशी काही महत्त्वाची खाती स्वतःकडेच ठेवण्याबाबत भाजप ठाम आग्रही होते. मात्र आता राजकीय परिस्थिती अवघड झाल्याने महसूल आणि वित्त ही खाती शिवसेनेला देऊन नाराजी दूर करता येईल का ?, यासाठी भाजपा प्रयत्नशील असल्याचे समजत आहे. यामध्ये आणखी काही महत्त्वाची खातीही शिवसेनेला दिली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान सत्तास्थापनेचा पेच लवकरच सुटेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट आहे हे पाहाता सरकार लवकरात लवकर स्थापन झालं पाहिजे. काळजीवाहू सरकारलाही काही ना काही बंधनं असतात, तरी जे निर्णय घेता येतात ते काळजीवाहू सरकार घेतच आहे. त्यामुळे राज्याचं हित पाहता लवकरात लवकर सरकार स्थापन होणं गरजेचं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सगळ्यांना महाराष्ट्राच्या हितासाठी काम करायचं आहे. राज्याच्या शेतकऱ्यांवर मोठं संकट आहे. या संकटामध्ये नवीन सरकार लवकरात लवकर स्थापन होईल, अशी माझी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्रातला सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष घालणार असल्याचं समजतंय. रविवारी संध्याकाळी मोदी बँकॉक दौऱ्यावरून दिल्लीला परतणार आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अकोल्यातील दौरा आटोपून मुंबईत परतणार आहेत.
भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार का? शिवसेनेच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोदी काय निर्णय घेणार? याकडे आता लक्ष लागलं आहे. दरम्यान, भाजपनं उपमुख्यमंत्रीपदासह ८ कॅबिनेट आणि ८ राज्यमंत्री अशी एकूण १६ मंत्रिपदं सेनेला देण्याची तयारी दाखवलीय, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.