मनमाड : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी मनुस्मृती दहन केल्याच्या रागातून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. या निषेधार्थ मनमाडला भुजबळ समर्थकांनी मोर्चाचे आयोजन केलं. महात्मा फुले पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस, समता परिषद आणि भुजबळ समर्थक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत धमकी देणाऱ्यांवर कड़क कारवाई करण्याची मागणी केली.
मनुस्मृतीला विरोध केलात तर तुमची अवस्थाही दाभोलकर आणि पानसरे यांच्यासारखी करु, अशी धमकी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना देण्यात आली. नाशिकमधील 'भुजबळ फार्म' हाऊसवर एका निनावी पत्र पाठवण्यात आले होते. या पत्रामुळे एकच खळबळ उडाली.
या पत्रात संभाजी भिडेंबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्यावरूनही भुजबळांना धमकावण्य़ात आले आहे. गुरुजींचे कार्य तुला कळणार नाही. यापुढे त्यांच्याबद्दल एखादे अवाक्षर काढले तर तुम्हाला संपविण्यासाठी वेळ लागणार नाही, असा मजकूर या पत्रात आहे.
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केल्याचे समजते. तसेच, या धमकीच्या पत्रामुळे ‘भुजबळ फार्म’वर अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमा होत आहेत.