प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : शेतातून परतणाऱ्या तरुणाची हत्या (Bhandara Crime) झाल्याने भंडाऱ्यात (Bhandara News) एकच खळबळ उडाली आहे. हा तरुण शेतातून दूध घेऊन घराकडे येत होता. मात्र वाटेतच त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Bhandara Police) घटनास्थळी धाव घेतली आहे.
रामपूर गावालगतच्या शेतात मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. प्रदीप लक्ष्मण धांडे (35) असे मृत तरुणाचे नाव असल्याचे समोर आले आहे. मोहाडी तालुक्यातील रामपूर-मांडेसर येथील प्रदीप धांडे हा शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय करत होता. 22 मार्च रोजी संध्याकाळी शेतात बांधलेल्या जनावरांच्या दूध काढण्यासाठी प्रदीप धांडे गेले होते. दूध काढल्यानंतर दुधाची बकेट घेऊन प्रदीप धांडे घराकडे निघाले होते. मात्र बराच वेळ प्रदीप धांडे हे घराकडे न परतल्याने त्यांचा शोध सुरु करण्यात आला.
शोध घेतल्यानंतर गावालगत असलेल्या शेतात प्रदीप यांचा मृतदेह आढळून आला. अज्ञातांनी प्रदीप यांच्या डोक्यावर वार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर याची माहिती मोहाडी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. तपासामध्ये प्रदीप यांच्याच्या डोक्यावर जखम असल्याने दिसून आले आहे. तर प्रदीप यांची हत्या केल्याची शंका भंडारा पोलिसांनी वर्तवली आहे.
रेल्वेमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
नांदेडमध्ये रेल्वेच्या शौचालयात एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. धर्माबादवरून आलेल्या तपोवन एक्सप्रेसची नांदेड मध्ये साफसफाई सुरू होती. त्यावेळी शौचालयात महिलेचा मृतदेह आढळून आला. मृत महिलेचे वय हे 30 ते 35 वर्षे असल्याचे समोर आले आहे. या महिलेच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा असून तिचा खून केल्याचा प्राथमिक संशय आहे. ही महिला परराज्यातील असून रेल्वेमध्ये सुई दोरा विकण्याचे काम करत होती अशी माहिती रेल्वे पोलीसांनी दिली. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवाला नंतर स्पष्ट होणार आहे. घटनेबाबत अधिक तापस नांदेड रेल्वे पोलीस करत आहेत.