बीडमध्ये 14 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार; पीडित मुलगी आई वडिलांसह गावातून गायब

Beed Crime News : बीडच्या पांगरी तालुक्यात हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीवर अत्याचार झाल्यानंतर पीडितेसह तिचे आई वडील गावातून गायब झाले आहेत. शोध घेतल्यानंतरही न सापडल्याने पीडितेच्या नातेवाईकाने राज्य महिला आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 29, 2023, 03:57 PM IST
बीडमध्ये 14 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार; पीडित मुलगी आई वडिलांसह गावातून गायब title=
(प्रातिनिधीक छायाचित्र - PTI)

विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : बीडच्या (Beed Crime) पांगरी तालुक्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पांगरी येथे एका 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार अत्याचार झाल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व प्रकारानंतर पीडित मुलगी आणि तिचे आई वडील गावातूनच गायब असल्याचे समोर आले आहे. पीडितेच्या चुलत भावाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी करत न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सततच्या लैंगिक अत्याचारातून पीडित मुलगी साडेसहा महिन्याची गर्भवती राहिल्याचेही समोर आले आहे. पाच ते सहा जणांनी मिळून सातत्याने 14 वर्षांच्या पीडितेवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. या सर्व प्रकारानंतर पीडिता व तिचे आई-वडील गावातून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पीडित मुलीच्या नातेवाईकाने महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांना पत्र लिहीत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पीडित मुलीच्या आई-वडिलांना सातत्याने धमक्या येत असल्यामुळे ते गावातूनही निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. तसेच बेपत्ता असलेल्या तिघांचा शोध घेतला असता ते कुठेही सापडले नाहीत. त्यामुळे पीडितेच्या नातेवाईकाने याबाबत तक्रार दाखल केली आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने बीड जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, नातेवाईकाने महिला आयोगाला लिहिलेले पत्र झी 24 तासच्या हाती लागलं आहे.

काय म्हटंलय पत्रात?

पीडित मुलीच्या चुलत भावाने हे पत्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना लिहीले आहे. "बीड येथे राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीवर गावातील रणजीत शिवदास शेंडगे व इतर नराधमांनी सतत सामूहिक लैंगिक अत्याचार केला. सदरच्या सततच्या लैगिंक अत्याचारातून पीडित मुलगी ही साडेसहा महिन्याची गर्भवती राहिलेली आहे. तसेच सदरील नराधमांनी पीडित मुलगी व तिचे आई वडील यांना अज्ञातस्थळी गायब केले आहे. पीडित मुलीचा गर्भपात करण्यासाठी सदरचे नराधम हे पीडिता व तिचे आई वडील यांच्यावर दबाव आणणत असून गर्भपात केला तर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. तसेच आम्हा नातलगांच्या जीविताससुद्धा या नराधमांपासून धोका आहे. सदर मुलगी ही अज्ञान बालिका आहे. वरील नराधमांनी जर तिचा जबरदस्ती गर्भपात केला तर तिच्या जीवितास धोका आहे. तरी मी विनंती करतो की, पीडितेचा व तिच्या आईवडिलांचा तात्काळ शोध घेऊन वरील नराधममांवर बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्याचे आदेश बीडच्या पोलीस अधिक्षकांना देण्यात यावेत आणि आम्हाला न्याय दावा," असे या पत्रात म्हटलं आहे.