राज्यात प्रशासकीय कामं रखडली, मुख्यमंत्री दिल्ली वाऱ्या करताहेत; बाळासाहेब थोरातांची टीका

परिस्थितीचा डाव साधायचा म्हणून सर्व काही केलं आहे. हेच चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरून उघड होतं अशी खरमरीत टीका काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

सागर कुलकर्णी | Updated: Jul 26, 2022, 12:02 PM IST
राज्यात प्रशासकीय कामं रखडली, मुख्यमंत्री दिल्ली वाऱ्या करताहेत; बाळासाहेब थोरातांची टीका title=

मुंबई : परिस्थितीचा डाव साधायचा म्हणून सर्व काही केलं आहे. हेच चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरून उघड होतं अशी खरमरीत टीका काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकारणी बैठकीत विधान केले होते की, छातीवर दगड ठेवत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना केले आहे. नेमका याच विधानावरून आता विरोधकांनी भाजपाची राजकीय कोंडी करायचे ठरवले आहे. कालच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी याबाबत विधान करताना चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील टीका केली आहे. 

चंद्रकांत पाटील मनातलं दुःख बोलले आहेत. जे मनात खरं आहे तेच ते बोलले आहेत त्यांनी भाजपचा मनात काय चाललं आहे ते स्पष्ट सांगितले आहे परिस्थितीचा डाव साधायचा म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचं उघड केला आहे, अशी टीका थोरात यांनी करताना राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील टीका केली आहे.

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार नाही, दोनच मंत्री सर्व कारभार करत आहेत. यामुळे प्रशासन सुस्त झाले आहे. सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त आहे तर दुसरीकडे अतिवृष्टीने अनेक भागात शेतकरी मध्ये असंतोष आहे. 

अशा परिस्थितीत कोणतीही थेट मदत अद्याप पर्यंत जाहीर झालेली नाही. मंत्रिमंडळ विस्तार नाही, अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या नाहीत प्रमोशन थांबले आहेत निर्णय घ्यायचे थांबले आहे मुख्यमंत्री मात्र वारंवार दिल्ली वारीला जात आहे अशी टीका थोरात यांनी केली आहे.