पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित वीरेंद्र तावडेला जामीन मंजूर

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आणि दुसरा आरोपी वीरेंद्र तावडेला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Updated: Jan 30, 2018, 09:37 PM IST
पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित वीरेंद्र तावडेला जामीन मंजूर  title=

कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आणि दुसरा आरोपी वीरेंद्र तावडेला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर करतानाच पासपोर्ट जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत. तसंच कोल्हापुरात येण्यासही मज्जाव करण्यात आलाय. तावडेकडून साक्षीदारांवर दबाव टाकण्यात येऊ नये यासाठी अनेक अटी लावण्यात आल्या आहेत. 

कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची १६ फेब्रुवारी २०१५  गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर पोलीसांनी आठ महिन्याच्या तपासनंतर १६ सप्टेंबर २०१५ रोजी समीर गायकवाड याला सांगलीतून अटक केली आणि त्यानंतर कट रचल्याचा आरोप वीरेंद्र तावडे यालाही CBI कडून ताब्यात घेवून अटक केली. 

सरकारी वकिलांनी या दोन्हीही आरोपींना जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न केले. मात्र सुरुवातीला समीर गायकवाडला काही अटी शर्तींवर जिल्हा सत्र न्यायालायनं १७ जून २०१७ रोजी जामीन दिला. त्यानंतर तावडे याच्या वकिलांनी जामीनासाठी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालायत  अर्ज दाखल केला. दोन्ही बाजुचे युक्तीवाद ऐकूण कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं तावडे याचाही २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय.