बदलापूरच्या पूरग्रस्तांना सरकारी मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

अतिवृष्टीमुळे बदलापूर आणि परिसरात मोठा पूर आला होता.

Updated: Jul 29, 2019, 07:18 PM IST
बदलापूरच्या पूरग्रस्तांना सरकारी मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन title=

कल्याण : दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बदलापूर आणि परिसरात मोठा पूर आला होता. या पूरग्रस्तांना सरकारी मदत देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. मुरबाड शहरातील विकासकामांचं उद्घाटन आणि भूमीपूजनासाठी मुख्यमंत्री आज मुरबाडमध्ये आले होते. यावेळी दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुरात बाधित झालेल्या लोकांना शासकीय मदत देण्याची मागणी बदलापूर आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. 

आत्तापर्यंत अशाप्रकारे बाधित झालेल्यांना फक्त ५ हजार रुपयांच्या सरकारी मदतीचा जीआर आहे. त्यामुळे आता नवीन जीआर काढून या बाधितांना भरीव मदत देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. या पुरामुळे अनेक रस्त्यांचंही मोठं नुकसान झालं असून हे रस्ते एमएमआरडीएच्या माध्यमातून पुन्हा तयार केले जातील, तसंच पुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. 

मुरबाड कल्याण रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार ५० टक्के खर्चाचा वाटा उचलून हे पैसे वेळेत देईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं. यावेळी मुरबाड शहरातील नवीन बसस्थानक, धान्य गोदाम आणि कॉलेजच्या वास्तूचं भूमीपूजन करण्यात आलं, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.