कोल्हापूर : कौटुंबिक वादातून सासऱ्याचा जावयाने खून केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहरनगर येथे घडली आहे. धोंडीराम मारुती रावण असं मृत सासऱ्याचे नाव असून संशयीत जावई अजित बाळासो पाटील हा या घटनेनंतर पसार झाला आहे. जावयाच्या हल्ल्यात सासू राधा आणि पत्नी रुपाली या दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर कोल्हापूरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिसांत झाली आहे. धोंडीराम यांची मुलगी रुपाली हिचा विवाह दहा वर्षापूर्वी अजितशी झाला. त्यांना एक पाच वर्षाची मुलगी आहे.
काल रात्री कौंटुबिक वादातून अजितने खुरप्याने सासरा धोंडीराम, सासू राधा आणि पत्नी रुपाली यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये सासरा धोंडीराम यांच्या डोक्यावर वर्मी घाव बसला. त्यामुळे ते रक्तबंबाळ होवून बेशुद्ध पडले. तर राधा व रुपाली या दोघीपण गंभीर जखमी झाल्या.