Raj Thackeray Exclusive: राजकीय पक्ष मेला तरी चालेल, पण महाराष्ट्र मरता कामा नये; राज ठाकरे स्पष्टच बोलले

Raj Thackeray Exclusive: आपण काहीही केलं तरी निवडून आलो तर त्या व्यक्तींना आपण करतोय ते बरोबर आहे असं वाटेल आणि असं झालं तर महाराष्ट्र ताब्यात राहणार नाही अशी भिती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS President Raj Thackeray) व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी 24 तासला दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलास उत्तरं दिली.   

शिवराज यादव | Updated: Nov 10, 2024, 02:03 PM IST
Raj Thackeray Exclusive: राजकीय पक्ष मेला तरी चालेल, पण महाराष्ट्र मरता कामा नये; राज ठाकरे स्पष्टच बोलले title=

Raj Thackeray Exclusive: महाराष्ट्रात आज ज्या प्रकारचं राजकारण सुरु आहे ते पाहता तीच माणसं सतत निवडून आली तर आपण केलं आहे ते बरोबर असं त्यांना वाटेल. हा समज वाढत राहिला तर महाराष्ट्र ताब्यात पाहणार नाही आणि व्याकरण बिघडलेलं असेल अशी भिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. राज ठाकरेंनी यावेळी भाजपा, शिवसेना या पक्षांचा इतिहास सांगत आपल्या पक्षाच्या स्थितीवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी प्रादेशिक पक्षांना महाराष्ट्रात यश का मिळत नाही? महाराष्ट्रातून बाहेर जाणारे उद्योग यावरही भाष्य केलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी 24 तासला दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलास उत्तरं दिली.  

"माझ्या पक्षापेक्षा महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून ही निवडणूक पाहणं गरजेचं आहे. गेल्या 5 वर्षात ज्या प्रकारच्या घडामोडी महाराष्ट्रात घडल्या, त्या लढवल्या कोणी आणि पुढे काय झालं? युतीमधले आघाडीत गेले, आमदार पळवले, सगळा गोंधळ झाला आहे. कोणताही राजकीय पक्ष मेला तरी फरक पडत नाही, पण महाराष्ट्र मरता कामा नये. महाराष्ट्रात आज ज्या प्रकारचं राजकारण सुरु आहे ते पाहता तीच माणसं सतत निवडून आली तर आपण केलं आहे ते बरोबर असं त्यांना वाटेल. हा समज वाढत राहिला तर महाराष्ट्र ताब्यात पाहणार नाही आणि व्याकरण बिघडलं असेल. महाराष्ट्राची पुढील परिस्थिती काय असेल याची कल्पना न केलेलीच बरी. माझ्यापेक्षा महाराष्ट्राचं भवितव्य महत्वाचं आहे. 5 वर्षात मतांची प्रताडणा, अपमान हे पाहता डोळसपणे मतदान करणं गरजेचं आहे," असं राज ठाकरे म्हणाले आहेत. 

"आरएससची स्थापना 1925 साली झाली. 1952 झाली जनसंघ नावाची विंग जन्माला आली. ते आले तेव्हा आमच्या हातात सत्ता द्या सांगायला आले. काँग्रेसच्या हातात सत्ता देऊ नका हे सांगत होते. 1966 साली जन्माला आलेल्या शिवसेनेनेही सत्ता द्या सांगितलं. 1952 मध्ये आलेल्या जनसंघाचा भाजपा नाव झालं. 1984 साली त्यांचे दोन खासदार आले, तेव्हा सत्ता द्या हीच मोहीम होती. 2014 ला त्याला संपूर्ण बहुमत मिळालं. 1952 ते 2014 पर्यंत ते सत्ता हातात द्या हेच सांगत होते. बाळासाहेबही 1995 नंतर तेच सांगत होते. मी काय वेगळं करत आहे," असंही राज ठाकरे म्हणाले. 

"2014 च्या निवडणुकीत 60-65 वर्षं ज्यांची सत्ता होती त्यांचे 44 खासदार निवडून आले. तर माझं काय घेऊन बसलात, तर बाकी पक्षाचं काय घेऊन बसलात. ज्या मायावतींच्या हातात सत्ता होती त्यांचा एक खासदार निवडून आला नाही. ही स्थत्यंतर प्रत्येक राजकीय पक्षाच्या बाबतीत होतात, परिस्थिती बदलत असते. येथे कायमची कोणतीही गोष्टनाही. येथे थांबून चालत नाही. जमिनीत पाय रोवून पुढे जावं लागतं," असं राज ठाकरेंनी सांगितलं. 

महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांना यश का मिळत नाही? असं विचारलं असता त्यांनी महाराष्ट्र एक राहत नाही असं सांगितलं. "एकदा पुण्याला प्रकाश सिंह बादल यांचा माझ्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार होता. मी आणि प्रकाश सिंह बादल टिळक स्मारकला पोहोचलो. फडणवीसांना येण्यास उशीर होत होता. यावेळी आम्ही गप्पा मारत होतो. तेव्हा मी त्यांना महाराष्ट्राबद्दल सांगत होतो. मी त्यांना महाराष्ट्राची विविधता सांगत होतो. कोकणात, विदर्भात, पश्चिम महाराष्ट्र असं वेगवेगळ्या ठिकाणी असणारी खाद्यसंसंकृती सांगत होतो. त्यावर त्यांनी मला पंजाबमध्ये सगळीकडे एकाच प्रकारचं जेवण असतं असं सांगितलं. जे एकाच प्रकारचं जेवतात ते एकत्र राहतात. वेगवेगळं जेवण खाणारे एकत्र राहत नाहीत. महाराष्ट्रातही इतर राज्यांप्रमाणे भाषेचा अभिमान हवा. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर फक्त हा महाराष्ट्र एकत्र येतो," असं राज ठाकरे म्हणाले. 

"बाळासाहेबांनी दाक्षिणात्यांचा मुद्दा घेतला तेव्हा तो मुंबईपुरता होता. पण जोपर्यंत दरवाजापर्यंत टकटक होत नाही तोपर्यंत जाग येत नाही. मी मराठीचा  मुद्दा मांडला तेव्हा तो ठाणे, दादरपर्यंत गेला.  भान ठेवलं तर एकत्र राहू. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतोय याचा अर्थ ती किती प्राचीन आहे याचा अभिमान असायला हवा. आपण मराठी बोलतोय म्हणजे मराठी आहोत हे समजायला हवं. इतर राज्यातील पक्ष त्यांची अस्मिता सोडत नाहीत. कावेरीच्या प्रश्नावर तामिळनाडूत दोन्ही पक्ष एकत्र येतात, कलाकार रस्त्यावर उतरतात. एक राज्यातील सत्ताधारी-विरोधी-अभिनेते रस्त्यावर उतरत असतील तर एखाद्या गोष्टीचा अभिमान काय असतो हे जाणवतं. तुम्ही भाषेवर ठाम राहिलं पाहिजे. येथे येणाऱ्या उद्योगंमध्ये 100 टक्के येथील तरुण असतील. उरले तर इतरांना सांगा. नोकऱ्या उपलब्ध आहेत हे समजत नसेल तर आपल्या लोकांचं दुर्देव आहे. आपले राजकारणीच यासाठी कारणीभूत आहेत," अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.