'अमित शाहला पाच वर्षांपूर्वी कोण ओळखत होतं का ?'

 सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहंकाळ मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुमनताई आर.आर.पाटील यांची प्रचारसभा

Updated: Oct 16, 2019, 08:05 AM IST
'अमित शाहला पाच वर्षांपूर्वी कोण ओळखत होतं का ?'  title=

रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : मी काय केलं असं म्हणणाऱ्या या अमित शाहाला पाच वर्षांपूर्वी कोण ओळखत तरी होत का ? तुम्ही इतक्या वर्ष कोठे होते. मी काय केलं म्हणणाऱ्या अमित शाह लेका, तुम्ही महाराष्ट्रात काय काम केलं ? इथे काय दिवे लावले ते सांगा, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहंकाळ मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुमनताई आर.आर.पाटील यांच्या प्रचारसभे दरम्यान बोलत होते. तासगाव मधील चिंचणी गावात ही सभा झाली.

कुस्तीची भाषा मुख्यमंत्री बोलत आहेत. तुम्ही अशी भाषा करू नका. कुस्ती करणं हे तुमचं काम नाही. मी कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे. पैलवान तयार करण्याचे काम मी करत असतो. आणि त्यामुळे कुस्ती करणं हे तुमचं काम नाही अशी टीका शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर  केली आहे.

भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे आजपर्यंत अनेक कारखाने बंद पडले आहेत. कारखाने बंद पडल्यामुळे हजारो युवकांच्या नोकऱ्या गेल्या. हे भाजपा सरकार संकटात अडकलेल्या कारखानदारीला वाचवण्यासाठी तयार नाही. त्यामुळे बेकारी वाढली. भाजपावाले कोणासाठी हे राज्य करत आहेत ? हेच कळत नाही. ही निवडणूक महत्वाची आहे. राज्याने भाजपचे राज्य पाहिले आहे. सत्तेचा वापर हा लोकांच्या भल्यासाठी करायचा असतो. याचे विसमरण झालेले हे भाजपाचे सरकार आहे.

100 ते 200 जणांनी 81 हजर कोटी थकवले. त्याची चिंता भाजपावाल्यांना आहे. मात्र शेतकऱ्यांचे पैसे थकले की त्यांच्या घरावर जप्ती आणता. आम्ही आमचे सरकार होते तेंव्हा कर्ज माफ केलं होत. त्यावर व्याज ही माफ केले होते. तुम्हाला मदत करण्यासाठी आघाडी सरकार अग्रभागी होते असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.