विधानसभा निवडणूक २०१९ : रायगडमध्ये कोणाची हवा?

आगामी विधानसभा निवडणुकीत नेमकी कुणाची हवा

Updated: Sep 14, 2019, 07:08 PM IST
विधानसभा निवडणूक २०१९ : रायगडमध्ये कोणाची हवा? title=

प्रफुल्ल पवार , झी मीडिया, रायगड : रायगडमधील राजकीय परिस्थिती बदलत चालली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत नेमकी कुणाची हवा असेल हे तर येणारी वेळच सांगेल. मुंबईला लागून असलेला रायगड जिल्हा... भाताचं कोठार ही त्याची ओळख... गेल्या काही वर्षांत औद्योगिकरणानं रायगडचा चेहरामोहरा बदलून गेला. आता इथली राजकीय परिस्थितीही बदलत चालली आहे. रायकड जिल्ह्यात विधानसभेचे एकूण सात मतदारसंघ येतात. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी २ जागा जिंकल्या, तर भाजपनं एका जागेवर विजय मिळवला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत, मोदी लाट असतानाही, शिवसेनेचे अनंत गिते पराभूत झाले. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी ३१ हजार मतांनी त्यांना पराभूत केलं. सातपैकी श्रीवर्धन आणि अलिबाग या दोनच मतदारसंघात तटकरे यांना तर कर्जतमध्ये पार्थ पवार यांना मताधिक्य मिळालं. त्यामुळे लोकसभेला रायगडात राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय मिळवला असला तरी त्याचा परिणाम विधानसभेत दिसेल का याबाबत शंकाच आहे.

गेल्या वेळी श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीचे अवधूत तटकरे हे काठावर पास झाले होते. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती यांनी ही जागा लढवली तर तटकरे विरुद्ध तटकरे अशी लढत इथं पाहायला मिळेल. महाडमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले विरूद्ध माणिक जगताप तर अलिबागेत शेकापचे विद्यमान आमदार पंडित पाटील विरूध महेंद्र दळवी अशी लढत पाहायला मिळेल असा अंदाज आहे. कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांच्या विरोधात शिवसेना नवीन चेहरा देण्याची शक्यता आहे.

पेणची जागा शिवसेना यावेळी भाजपाला सोडू शकते. तिथं नुकतेच भाजपात गेलेले काँग्रेसचे माजी मंत्री रविंद्र पाटील यांनी तयारी केली आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीबरोबरच शेकापही महाआघाडीत सामील असला तरी तरी अलिबागची जागा लढवण्याचा स्थानिक कॉंग्रेसवाल्यांचा अट्टाहास आहे. हा तिढा सोडवण्याचं आव्हान सुनील तटकरेंसमोर असणार आहे.

कोणत्याही लाटेवर स्वार न होणारा जिल्हा अशी ओळख असलेला रायगड जिल्हा यावेळी कोणाच्या पारडयात मतांचे दान टाकतो हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.