उत्तर पत्रिका जळाल्याप्रकरणी विद्यार्थ्यांना असे मार्क्स देणार

दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका जाळल्याचं प्रकरणात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

Updated: May 29, 2018, 03:37 PM IST
उत्तर पत्रिका जळाल्याप्रकरणी विद्यार्थ्यांना असे मार्क्स देणार title=

बीड : दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका जाळल्याचं प्रकरणात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या जवळपास १३०० उत्तरपत्रिका, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील गटसाधन केंद्रात जाळण्यात आल्या होत्या. या प्रकरणात १४ कर्मचाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आलं होतं, पण यात विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होणार अशी भीती होती, अखेर बोर्डाने यावर उपाय काढत, इतर विषयातील सरासरीप्रमाणे या विद्यार्थ्यांना गुण देणार असल्याचं म्हटलं आहे.

गटसाधन केंद्रातील दहावी आणि बारावीच्या गणित विषयाच्या उत्तरपत्रिकांना शनिवारी रात्री 7.30 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली होती. यामध्ये जवळ-जवळ १३०० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या होत्या.

दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका सील करून त्या कपाटात ठेवणं गरजेचं होतं, मात्र गटशिक्षणाधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा झाला आणि या आगीत उत्तरपत्रिका नष्ट झाल्या. याला जबाबदार म्हणून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 चे कलम 3 चा भंग केल्याच्या आरोपाखाली 14 जणांना निलंबित करण्यात आलं होतं.