Samruddhi Highway : गाडीचं टायर फुटला अन् होत्याचं नव्हतं झालं... ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांसह सरकारचीही चिंता वाढली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आता आहेत. मात्र तरीही अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये.

आकाश नेटके | Updated: Apr 13, 2023, 12:28 PM IST
Samruddhi Highway : गाडीचं टायर फुटला अन् होत्याचं नव्हतं झालं... ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया अमरावती : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) अपघातांची मालिका अद्यापही सुरूच आहेत. समृद्धी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात असतानाही लोकांचा बळी जात आहे. समृद्धी महामार्गावर खराब झालेल्या टायर असलेल्या वाहनांना प्रवासास प्रतिबंध घालणे सुरू झाले असतानाच पुन्हा एका कारचा टायर फुटून अपघात झाला आहे. या अपघातात (Accident News) दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णलयात उपचार सुरु असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.

मुंबईवरून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कारचा अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या शिवनी फाट्यावर हा भीषण अपघात झाला. समोरील टायर फुटल्याने कार थेट डिव्हायडरला धडकली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे दहिसर विधानसभा समन्वयक अतुल तावडे यांच्यासह राजू शिंदे नामक व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

अतुल तावडे हे आणखी चौघांसोबत मुंबईच्या दहिसरवरुन समृद्धी महामार्गावरुन अमरावतीकडे निघाले होते. अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या शिवनी फाट्याजवळ तावडे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. शिवनी फाट्याजवळ गाडीचा पुढचा टायर फुटल्याने ती थेट डिव्हायडरला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की गाडीचा पुढच्या भागाचा अक्षरक्षः चुराडा झाला. अपघातात अतुल तावडे आणि राजू शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले.

दरम्यान, अतुल तावडे आणि राजू शिंदे हे दोघेही दहिरसरचे रहिवासी होते. कार चालकासमोरील एअर बॅग उघडल्यामुळे त्याला कमी मार लागला, मात्र मागे बसलेले दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अमरावतीत खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

गेल्या आठवड्यातही समृद्धी महामार्गावर गाडीचा टायर फुटल्याने असाच अपघात झाला होता. मात्र सुदैवाने या कोणतीही जीवितहानी झाली नाही. नागपूरहून एक कार समृद्धी महामार्गावरून शिर्डीकडे जात होती. त्यावेळी येळकेली ते पुलगावदरम्यान कारचा टायर फुटून ती बॅरिकेट्सला धडकली. यामुळे कारचा समोरच्या भागाचा चुराडा झाला. या कारमध्ये  दोन लहान मुलांसह, दोन महिला व दोन पुरुष प्रवास करत होते. दुसरीकडे, नागपूर-शिर्डीदरम्यान सुरु झालेल्या समृद्धी महामार्गावर पहिल्या 100 दिवसांमध्येच 900 अपघात झाले आहेत.  यामधल्या 22 अपघांमध्ये काही जणांचा बळी गेलाय. तर अनेक जण जखमी झाले आहेत.