Ambolgad Beach Rajapur Ratnagiri : महाराष्ट्रात अशी अनेक गाव आहे जी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या गावांचे वेगळेपणच त्यांची ओळख असते. महाराष्ट्रातील एका गावात चंद्रकोर आकाराचा सर्वात सुंदर छुपा समुद्र किनारा आहे. या समुद्राचा आकार हा मुंबईच्या मरीन ड्राईव्ह प्रमाणे क्वीन नेकलेससारखा अर्धवर्तुळाकार आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यात हा समुद्र किनारा आहे.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यातील आंबोळगड गावात हा समुद्र किनारा आहे. आंबोळगड हे गाव आंबोळगड किल्ल्यासाठी आणि श्रीगगनगिरी स्वामींच्या मठासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, अद्यापही आंबोळगड गावातील समुद्र किनारे गर्दीपासून अलिप्त आहेत.
रत्नागिरी शहरापासून 57 किमी तर राजापूर पासून 36 किमी अंतर आंबोळगड हे गाव आहे. आंबोळगड हे गाव तिन्ही बाजूने अरबी समुद्राने वेढलेला आहे. तर गावाची एका बाजू पठाराच्या दिशेने नाटे या गावाशी जोडलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात दोन किनारी दुर्ग आहेत. यापैकीच एक आहे तो आंबोळगड आणि दुसरा म्हणजे यशवंतगड. मुसाकाजी या प्राचीन बंदरावर तसेच समुद्रावर नजर ठेवण्यासाठी आंबोळगड बांधण्यात आला आहे. किल्यात एक तुटलेली तोफ या व्यतिरिक्त येथे काही नाही. मुद्राच्या बाजूची काही तटबंदी शाबूत आहे. किल्ल्याजवळच्या सड्यावर गगनगिरी महाराजांचा मठ आहे.
आंबोळगड गावात दोन सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारे आहेत. राघोबाची वाडीस लागून असणाऱ्या समुद्रकिनाऱ्यास "गोडिवणे किनारा" म्हणतात. येथे अनेक पर्यटक भेट देतात. तर, दुसरा बंडवाडीचा छोटासा समुद्र किनारा आहे. हे दोन्ही समुद्र किनारे एकत्ररित्या चंद्रकोर आकाराप्रमाणे भासतात. धारतळे मार्गे आंबोळगड हे अंतर 35 किमी अंतरावर आहे. रत्नागिरी स्थानकातून आंबोळगडला थेट एसटी बस आहे. ही बस आंबोळगड किल्ल्यापर्यंत पोहचवते.