कौतुकास्पद | पालिकेच्या 850 कर्मचाऱ्यांनी दिला एक दिवसाचा पगार

 एक दिवसाचा पगार कोरोनाच्या युद्धात लढण्यासाठी 

Updated: May 3, 2021, 02:25 PM IST
कौतुकास्पद | पालिकेच्या 850 कर्मचाऱ्यांनी दिला एक दिवसाचा पगार title=

अंबरनाथ : कोरोनाच्या युद्धात आरोग्य कर्मचारी, पोलीस, पत्रकार यांच्याप्रमाणेच पालिकेचे कर्मचारीसुद्धा जीव धोक्यात घालून काम करतायत. त्यातच अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आता आणखी एक कौतुकास्पद निर्णय घेतलाय. अंबरनाथ पालिकेचे सर्व कर्मचारी आपला एक दिवसाचा पगार कोरोनाच्या युद्धात लढण्यासाठी देणार आहेत.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपालिका ही 'अ' वर्ग नगरपरिषद असून या पालिकेत 850 कर्मचारी - अधिकारी कार्यरत आहेत. अंबरनाथ पालिकेनं कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील डेंटल कॉलेजमध्ये 600 बेडचं कोविड केअर सेंटर सुरू केलंय. हे सेंटर सुरू करताना शहरातील अनेक दानशूर व्यक्तींनी मोठा हातभार लावला होता. 

एका सेवानिवृत्त अंबरनाथकराने या कोविड केअर सेंटरला आपल्या रिटायरमेंटच्या पैशातून व्हेंटिलेटर दिला होता. त्यानंतर आता अंबरनाथ नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार कोरोनाच्या युद्धात लढण्यासाठी देण्याचा निर्णय घेतलाय. 

या सर्व कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मिळून 5 लाखांपेक्षा जास्त निधी अंबरनाथ पालिकेकडे जमा होणार असून त्यामध्ये मुख्याधिकारी, अतिरिक्त मुख्याधिकारी, नोडल ऑफिसर हे सुद्धा आपल्या परीने भर टाकणार आहेत. या सर्व रकमेतून अंबरनाथ पालिकेच्या कोव्हीड केअर सेंटरसाठी 5 बायपॅप मशीन घेण्याचा मानस अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी व्यक्त केला. 

अंबरनाथ पालिकेत झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमामध्ये पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी याबाबतचं पत्र मुख्याधिकाऱ्यांना दिलं. या मदतीमुळे शहरातील आरोग्यसेवेला मोठा हातभार लागणार असून रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांचं कौतुक होतंय.