अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : इयत्ता १२ची, २२ हजार रुपये शिल्लक असलेली शैक्षणिक फी भरु न शकलेल्या अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या मुलाची टीसी आणि मार्कशीट शाळेने अडवून ठेवल्याचा प्रताप वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील सैनिक शाळेने केला होता. त्यांनतर या शेतकरी पुत्राची व्यथा झी २४ तासने मांडल्यानंतर त्याची दखल शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेऊन त्या विद्यार्थ्यांला टीसी आणि मार्कशीट मिळवून दिली.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील घुसळी-कामनापूर येथील यश जगदीश काटगळे या शेतकऱ्याच्या मुलाला सैन्यात जाऊन देशसेवा करायची आहे. त्यासाठी त्याने वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील सैनिकी शाळेत इयत्ता पाचवी ते बारावी पर्यतचे शिक्षण घेतले. आता त्याला पुढील शिक्षणासाठी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरातील आदर्श महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. परंतु या शेतकऱ्याच्या मुलाकडे १२वीची सैनिकी शाळेची २२ हजारांची फी शिल्लक होती.
या वर्षी वडिलांना बोगस बियाणे आणि पावसाने सुरवातीला दडी दिल्याने या विद्यार्थ्यांच्या वडिलांना तीबार पेरणी करावी लागली. घरात होता नव्हता पैसा शेतीला लावला गेल्याने आता मुलाची २२ हजार शिल्लक फी भरण्याचीही परिस्थिती नसल्याने, सैनिकी शाळेने त्याला टीसी आणि गुणपत्रिका देण्यास नकार दिला होता. त्यामुळे आपल्या मुलाला पुढील शिक्षण कसे द्यावे असा प्रश्न या शेतकरी बापाला पडला होता.
दरम्यान या शेतकरी पुत्राची व्यथा झी २४ तास ने दाखवल्यानंतर या बातमीची दखल शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेत, या शेतकरी पुत्राला टीसी आणि मार्कशीट मिळवून दिली आहे.