Akola Crime News: 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर नराधमाने अक्षरशः अमानवी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोल्यातील या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अकोल्यातील खदान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला सिगारेटचे चटके देणं, तिचं मुंडन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणं, असा प्रकार दोन वर्षांपासून सुरू होता. तसंच, कोणालाही ही बाब सांगितल्यापासून कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी, नराधमाने दिली होती. गेल्या 2 वर्षांपासून पिडीत मुलगी हा अन्याय सहन करत होती.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आरोपीने पिडीत मुलीला सार्वजनिक स्थळी विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला होता. गणेश कुंभरे अस या गुंडाचं नाव आहे. या प्रकरणी अकोल्यातील खदान पोलिसांनी आरोपी गणेशला अटक केली आहे मात्र आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी पिडीतेच्या वडिलांनी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपासून लैंगिक, शारीरिक आणि मानसिक अत्याचार करणाऱ्या या आरोपीविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक, शारीरिक आणि मानसिक अत्याचाराची फिर्याद घेऊन गेले असता पोलिसांनी तक्रार लवकर घेतली नाही म्हणून पिडीत कुटुंबीयांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पोलिस प्रशासन दिरंगाईने कारवाई करत असल्याचा आरोप वंचितकडून केला जात आहे. पीडित मुलीवर मागील दोन वर्षांपासून धाकदपट आणि धमक्या देऊन आरोपीकडून लैंगिक अत्याचार करण्यात येत होतं तरी मात्र पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप वंचितने केला आहे.