अजित पवार महायुतीला नकोसे? आकडेवारी म्हणते BJP-शिंदेंसाठी अजितदादा 'निरुपयोगी'

Ajit Pawar Group Is Opposed From Mahayuti Parties: विधानसभेची निवडणूक तोंडावर असतानाच आता महायुतीमध्ये अजित पवारांना सोबत ठेवण्यावरुन मतमतांतरे असल्याचं समोर येत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 18, 2024, 10:24 AM IST
अजित पवार महायुतीला नकोसे? आकडेवारी म्हणते BJP-शिंदेंसाठी अजितदादा 'निरुपयोगी' title=
अजित पवार गटासंदर्भात नाराजी

Ajit Pawar Group Is Opposed From Mahayuti Parties: लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा घटक असलेल्या अजित पवार गटाचे आमदार असलेल्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी तसेच एकनाथ शिंदेंच्या गटातील उमेदवार पिछाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळेच आता महायुतीमध्ये दोन पक्षांना एकत्रितपणे बहुमत असताना तिसऱ्या पक्षाच्या गरजेसंदर्भात महायुतीमधील इतर दोन पक्षांतील नेतेच प्रश्न उपस्थित करु लागले आहेत. महायुतीमधील भाजपा आणि शिंदे गटाच्या अनेक नेत्यांना अजित पवार युतीत नकोसे झाल्याची चर्चा आहे. अजित पवारांच्या पक्षाची मतं भाजपा तसेच शिंदे गटाला ट्रान्सफर न झाल्याने ही नाराजी व्यक्त केली जात आहे. अजित पवारांची महायुतीत गरज काय यासंदर्भात आता भाजपामधील काही नेत्यांनी दबाव आणण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अजित पवार नको म्हणून दबाव

लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे पाहिल्यास अजित पवार गटाचे आमदार असलेल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपा तसेच शिंदे गटाचे उमेदवार पिछाडीवर राहिल्याने महायुतीला फटका बसल्याचं दिसत आहे. बरं असे एक दोन मतदारसंघ नसून अनेक मतदारसंघ आहेत. यामध्ये प्रामुख्याने सोलापूर, माढा, मावळ, दिंडोरी मतदारसंघांचा समावेश आहे. मावळमधून जिंकलेले शिंदेंच्या गटाचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांनी अजित पवार गटाने आपल्याला सहकार्य केलं नाही अशी नाराजी उघडपणे यापूर्वीच व्यक्त केली आहे. असाच अनुभव इतरांचाही असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीचा विचार करता अजित पवारांना महायुतीबरोबर ठेवावे की नाही याचा फेरविचार पक्षनेतृत्वाने करावा यासाठी भाजपा आणि शिंदे गटातील प्रभावशाली नेते नेतृत्वावर दबाव आणत असल्याची चर्चा आहे. थेट आकडेवारीचा आधार घेत महायुतीला अजित पवारांचा फायदा होत नसल्याचा या दबाव आणणाऱ्या नेत्यांचा दावा आहे.

नेमकं घडलं काय, ही घ्या आकडेवारी

सोलापूरमध्ये भाजपाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार राम सातपुते पराभूत झाले. काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंनी त्यांचा 74 हजार मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे या मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार असलेल्या यशवंत माने यांच्या मतदारसंघात सातपुते 63 हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर पडले. तसेच शरद पवार गटाच्या धौर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यात मोठा विजय मिळवला. इथं त्यांना भाजपाच्या रणजितसिंह मोहिते पाटलांना पराभूत केलं. रणजितसिंह 1 लाख 20 हजार मतांनी पराभूत झाले. या मतदारसंघात अजित पवार गटाचे संजय शिंदे आमदार असून त्यांच्या मतदारसंघातून शरद पवार गटाच्या उमेदवाराने 41 हजारांहून अधिकचं मतदाधिक्य मिळवलं. 

केंद्रीय मंत्र्यांनाही फटका

अजित पवार गटाचे आमदार असलेल्या मतदारसंघांचा फटका थेट केंद्रीय मंत्र्यांना बसल्याचा दावाही केला जातोय. दिंडोरीमध्ये मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री असलेल्या डॉ. भारती पवार पराभूत झाल्या. त्यांचा 1 लाख 13 हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला. या लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे चार आमदार असूनही त्याचा भाजपाच्या उमेदवाराला फायदा झाला नाही. चारही आमदारांच्या मतदारसंघात भारती पवार पिछाडीवर राहिल्या. भुजबळांच्या मतदारसंघातही भारती पवार 13 हजार मतांनी पिछाडीवर पडल्या. अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ आमदार असलेल्या दिंडोरीमध्ये शरद पवार गटाच्या भास्कर भगरेंनी 82 हजारांचं लीड मिळवलं.