नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसेभत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्याच सरकारवर प्रचंड संतापले. आज सकाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली. मात्र, त्यावेळी सभागृहात ठाकरे सरकारचा एकही मंत्री उपस्थित नव्हता. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.
हा सर्व प्रकार पाहून अजित पवार यांच्या संतापाचा पारा चढला. त्यांनी रागाच्या भरात सभागृहाच आपल्या सरकारला चार शब्द सुनावले. सहापैकी एकतरी मंत्री सभागृहात असायला पाहिजे होता. मंत्रिमंडळाचा विस्तार करु नका, असे तुम्हाला कोणी सांगितले होते का?, असा सवाल विचारत अजित पवार यांनी सर्वांची बोलती बंद केली.
अजित पवारच आमचे उपमुख्यमंत्री - संजय राऊत
आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. अधिवेशनाची सुरुवातीपासूनच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत तातडीने जाहीर करावी अशी मागणी करत विरोधकांनी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करतील, असा अंदाज आहे. अजित पवार यांनीही सभागृहात येण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबद्दलचे संकेत दिले. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सकारात्मक बातमी मिळेल, असे त्यांनी सांगितले. तसेच ३१ डिसेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असेही त्यांनी म्हटले. माझ्यावर कोणती जबाबदारी द्यायची याचा निर्णय शरद पवारच घेतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.