'ऐश्वर्या राय रोज मासे खाते म्हणून...'; शिंदे सरकारमधील भाजपाच्या मंत्र्याचा अजब सल्ला

CM Eknath Shinde Cabinet Minister About Aishwarya Rai Eyes: धुळ्यामधील एका कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील भाजपाच्या मंत्र्याने सार्वजनिकरित्या भाषण करताना अभिनेत्री ऐश्वर्या रायचा उल्लेख करत हे विधान केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 21, 2023, 12:27 PM IST
'ऐश्वर्या राय रोज मासे खाते म्हणून...'; शिंदे सरकारमधील भाजपाच्या मंत्र्याचा अजब सल्ला title=
जाहीर भाषणामध्ये त्यांनी हे विधान केलं

CM Eknath Shinde Cabinet Minister About Aishwarya Rai Eyes: महाराष्ट्रामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमधील आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी एका जाहीर भाषणात विचित्र विधान केलं आहे. बॉलिवूड अभिनेत्या रोज मासे खातात. ऐश्वर्या राय बच्चन रोज मासे खाते म्हणून तिचे डोळे इतके सुंदर आहेत असं गावित यांनी भाषणामध्ये म्हटलं आहे. गावित यांनी उपस्थितांना रोज मासे खाण्याचा सल्ला देताना तुम्ही रोज मासे खाल्ले तर तुमचे डोळेही ऐश्वर्याप्रमाणे सुंदर होतील असाही सल्ला दिला.

मच्छीमारांच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केलं भाषण

धुळ्यातील एका कार्यक्रमात विजयकुमार गावित सहभागी झाले होते. येथील मासेमारी करणाऱ्यांना साधनसामुग्रीच्या वाटपाचा कार्यक्रमात गावित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या ठिकाणीच गावित यांनी भाषण दिलं. यावेळेस डॉक्टर सुप्रिया गावितही उपस्थित होत्या. विजयकुमार गावित यांनी मासे खाण्याचे फायदे सांगताना, अभिनेत्री ऐश्वर्या राय रोज मासे खाते म्हणून तिचे डोळे इतके सुंदर आहेत असं म्हटलं. तुम्हालाही सुंदर डोळे हवे असतील तर रोज मासे खा असा अजब सल्लाही गावित यांनी दिला. 

ऐश्वर्या राय समुद्रकिनाऱ्याजवळ राहायची म्हणून...

विजय कुमार गावित यांनी, 'ऐश्वर्या राय बंगळुरुमधील समुद्रकिनाऱ्याजवळच्या परिसरात राहायची. रोज मासे खाल्ल्याने तिचे डोळे सुंदर आहेत. तुम्ही सुद्धा रोज मासे खा. कारण रोज मासे खाल्ल्याने त्वचा तजेलदार राहते. त्वचा तजेलदार राहण्यामागील मुख्य कारण म्हणजे यामध्ये तेल असतं. याच तेलाचा डोळ्यांना आणि त्वचेला फार फायदा होतो,' असं म्हटलं. गावित यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्येच कुजबूज सुरु झाली. अनेकांनी तिथेच हे विधान ऐकून आपल्या हावभावातून हे विधान फारसं पटलं नसल्याचं दर्शवलं.

वादग्रस्त कारकिर्द

विजयकुमार गावित पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्रीही होते. ते महाराष्ट्र सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि फलोत्पादन या खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते. त्यांनी अनेकदा अशाप्रकारची वादग्रस्त विधानं केली आहेत. एकदा तर ते पत्रकाराला धमकावल्याप्रकरणीही अडचणीत आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये आल्यानंतर त्यांनी पक्षाच्या तिकिटावर नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. डॉ. विजयकुमार गावित यांना भ्रष्टाचार प्रकरणावरून अनेकदा लक्ष्य करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एम.जी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने विजयकुमार गावित यांना आदिवासी कल्याण विभागातील भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवले होते. मात्र असं असतानाही त्यांना शिंदे सरकारच्या पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळालं. आदिवासी कल्याण विभागांतर्गत मंडळाचे पदसिद्ध प्रमुख असताना टेंडरशिवाय कोट्यवधी रुपयांची कामे वाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर सिद्ध झाला होता. 2017 मध्ये याचा अहवाल सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही.

संपूर्ण कुटुंब राजकारणात

विजयकुमार गावित यांचं संपूर्ण कुटुंब राजकारणात सक्रिय आहे. विजयकुमार गावित यांची मुलगी डॉ. हिना गावित या खासदार आहेत. दुसरी कन्या सुप्रिया या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सदस्या असून पत्नी कुमुदिनी गावित जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या आहेत. कुमुदिनी गावित या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आहेत.