एकनाथ शिंदे यांच्यावर अघोरी जादूटोणा ? धक्कादायक व्हिडिओ

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जादूटोणा करण्यात येत असल्याचा व्हिडीओ

Updated: Dec 18, 2020, 12:33 PM IST

अमित जोशीसह हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर: नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जादूटोणा करण्यात येत असल्याचा व्हिडीओ समोर आलाय. त्यामुळं सगळीकडे एकच खळबळ उडालीय. विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे तलावली गावातला हा धक्कादायक प्रकार आहे. 

नगरविकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटोपुढं हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू आणि सफेद कोंबडा कापून ठेवण्यात आला होता. शिंदेंच्या जीवाला धोका निर्माण व्हावा, यासाठी हा अघोरी जादूटोणा करण्यात आला होता. एखाद्या मंत्र्यावरच जादूटोणा करण्याचा हा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर कृष्णा बाळू कुरकुटे आणि संतोष मगरू वारडी या दोघा आरोपींना अटक करण्यात आलीय.

हे जादूटोणा करणारे लोकांना फसवून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याची बाबही उघड झालीय. 

या सगळ्या प्रकाराबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळलीय. अशाप्रकारच्या जादूटोण्याच्या घटनांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलंय..

महाराष्ट्रात जादूटोणा प्रतिबंधक कायदा करण्यात आला. मात्र कायदा करूनही ही अघोरी प्रथा अजून थांबलेली नाही. एखाद्या मंत्र्यावरच जादूटोण्याचा प्रयोग करण्याचा हा प्रकार गंभीरच आहे.

(झी 24 तास कुठल्याही काळ्या जादूचं समर्थन करत नाही... आम्ही कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचा निषेधच करतो.)