बिपरजॉय वादळाचा परिणाम; कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील थरारक CCTV फुजेट; लाटांमुळे पर्यटक जखमी

Biparjoy Cyclone Latest Update: महाराष्ट्रासह  बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका. 15 जूनपर्यंत धोका. मुंबईत येत्या 24 ते 48 तासांत ढगांची दाटी. काही ठिकाणी वादळी वारे वाहण्याचा अंदाज. तर आर्द्रताही वाढणार असल्याची  के. एस होसाळीकरांची माहिती.

वनिता कांबळे | Updated: Jun 12, 2023, 04:58 PM IST
बिपरजॉय वादळाचा परिणाम; कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील थरारक CCTV फुजेट; लाटांमुळे पर्यटक जखमी title=

Biparjoy Cyclone CCTV Footage :  एकीकडे महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टी भागात पहायला मिळलाा. गणपतीपुळ्यात समुद्राला उधाण आल्याचं चित्र पाहायला मिळालं. समुद्राच्या लाटा किना-यावर धडकल्यानं छोट्या दुकानदारांना फटका बसला आहे. कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील थरारक CCTV फुजेट व्हायरल झाले आहे. नागरिकांना समुद्र किनाऱ्यावर न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

कोकणात समुद्राच्या लाटेत अनेक पर्यटक जखमीही

बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टी भागामध्ये जाणवेल असं हवामान खात्याने जाहीर केलंय. त्याप्रमाणे किनारपट्टी भागांमध्ये लाटा उसळत आहेत. तसंच समुद्राचं पाणी देखील मानवी वस्तीच्या दिशेने येताना पाहायला मिळालं. तसंच वा-याचा वेगही वाढला.  समुद्राच्या पाण्यामुळे काही दुकानं उद्ध्वस्त झालीयेत. या लाटेत अनेक पर्यटक जखमीही झाले आहेत. गणपतीपुळ्यात समुद्राला अचानक उधाण आल्यानं पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली. बिपरजॉय चक्रीवादळाचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे.  

मुंबईतल्या समुद्रात उंच लाटा उसळल्या

बिपरजॉय वादळाचा परिणाम मुंबईतही पाहायला मिळाला. संध्याकाळच्या सुमाराला मुंबईतल्या समुद्रात उंच लाटा उसळलेल्या पाहायला मिळाल्या. त्यांचे तुषार झेलण्याचा आनंद यावेळी मुंबईकरांनी अनुभवला. 

बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 24 तासांत तीव्र रूप धारण करणार

बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 24 तासांत तीव्र रूप धारण करणार असून त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर मोठय़ा प्रमाणावर जाणवू शकतो, मात्र मुंबईला त्याचा फारसा धोका नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शनिवारी जोरदार वाऱ्यांमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात धूळ आणि वाळूचे लोट उसळले होते. त्यामुळे समुद्रही खवळला होता. आजही समुद्र खवळलेलाच आहे. जोरजोरात लाटा उसळत आहेत.

बिपरजॉय चक्रीवादळ गोव्याच्या पश्चिमेस सुमारे 700 किमीवर आणि मुंबईच्या नैऋत्येला 630 किमीवर आहे. आगामी 24 तासांत ते आणखी तीव्र होऊन ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टी आणि गुजरातमध्येही जाणवेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट

मान्सून दोन दिवसांत महाराष्ट्र, गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. बंगालचा उपसागर ते म्यानमारपर्यंतच्या किनारपट्टीपर्यंत असलेला कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी होणार आहे. त्यामुळे अनुकूल स्थिती निर्माण होऊन मान्सून वेगाने आगेकूच करेल. पोषक वातावरणामुळे पुढील दोन दिवसांत मान्सून गोवा, महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धडकेल. केरळमध्ये मान्सूनचं आगमन तब्बल 8 दिवस लांबलं. मात्र त्यानंतर मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण आहे. सध्या मोसमी वा-यांनी केरळचा उर्वरित भाग, कर्नाटकचा काही भाग आणि दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरातला काही भाग, पश्चिम बंगाल, सिक्कीमपर्यंत धडक मारली आहे. अरबी समुद्रातलं बिपरजॉय चक्रीवादळ आणखी उत्तरेकडे सरकेल. त्यानंतर त्याची तीव्रता कमी होईल. मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत असतानाच राज्यातला पाराही कमी झालीय. पूर्व मोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा. विदर्भात 14 जूनपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह, वादळी वा-यासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.