तो फोन कॉल, ऑफिसमधले लाईट्स गेले अन्..; Eyewitness ने सांगितला घोसाळकरांवरील गोळीबाराचा थरार

Abhishek Ghosalkar Shoot Dead: फेसबुक लाईव्हवर मुलाखत घेतल्यानंतर शेवटच्या काही क्षणांमध्ये ठाकरे गटाच्या या नगरसेवकावर गोळीबार करण्यात आला. तब्बल 5 गोळ्या चालवण्यात आल्या. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या नगरसेवकाचा मृत्यू झाला. पण नक्की ही घटना घडली कशी?

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 9, 2024, 08:50 AM IST
तो फोन कॉल, ऑफिसमधले लाईट्स गेले अन्..; Eyewitness ने सांगितला घोसाळकरांवरील गोळीबाराचा थरार title=
दहिसरमध्ये घडली ही धक्कादायक घटना

Abhishek Ghosalkar Shoot Dead: मुंबईमधील दहिसर येथे उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. फेसबुक लाईव्हवर घोसाळकर यांची मुलाखत घेतल्यानंतर मुलाखत संपताना लाइव्ह वेबकास्ट सुरु असतानाच हा गोळीबार झाला. या हल्ल्यानंतर मॉरिस भाईनेही आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र काल सायंकाळी मॉरिसच्या ऑफिसमध्ये नेमकं काय घडलं याची माहिती घटना घडली त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी महिलेने 'झी 24 तास'ला दिलेल्या माहितीत सांगितलं आहे.

मॉरिस बाहेर उभा होता

मॉरिसच्या कार्यलयामध्ये काही महिलांना बोलवण्यात आलं होतं. त्यामध्ये ही महिलाही होती. "सर्व महिलांनी ऑफिसमध्ये या असा फोन आम्हाला दुपारी 3 वाजता आला. गणपत पाटील नगर येथील शिवसेनेच्या ऑफिसमध्ये आम्हाला बोलावलं होतं. मात्र असं अचानक फोन करुन आम्हाला का बोलावलं, हे माहीत नव्हतं. आम्ही तिथे 2 तास बसलो होतो. मग आम्हाला आयसी कॉलनीच्या शाखेत बोलवण्यात आलं. तिथंही आम्ही दीड तास बसलो. तिथे गेल्यावर आम्हाळा कळलं की मॉरिसकडून महिलांना साड्या वाटप केलं जाणार आहे. मात्र आम्ही तिथे बसलेलो असताना 2 मिनिटांसाठी अचानक लाईट्स गेले. त्यावेळी आम्ही शाखेत बसलो होतो, तर मॉरिस बाहेर उभा होता," असं या महिलेने सांगितलं.

तो फोन कॉल

"मॉरिसने अभिषेक घोसाळकरांना त्याच्या ऑफिसमध्ये बोलावलं. शाखा आणि मॉरिसचं ऑफिस जवळजवळ आहे. घोसाळकर मात्र शाखेतच होते. पुन्हा मॉरिसने घोसाळकरांना फोन करुन घोसाळकरांना सांगितलं की मुलाखत घ्यायची असून त्यासाठी ऑफिसला या. या फोननंतर अभिषेक घोसाळकर हे प्रवीण नावाच्या कार्याकर्त्याबरोबर मॉरिसच्या कार्यालयात गेले. तो (प्रवीण) भाईंना (घोसाळकर) बोललाही की का जायचं आहे? मात्र घोसाळकर मॉरीसच्या ऑफिसमध्ये गेले," असं ही महिला म्हणाली.

नक्की वाचा >> 'घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला CM शिंदेंनी दिलेली पक्ष प्रवेशाची ऑफर'; '4 दिवसांपूर्वीच..'

गोळीबार झाल्याचं समजताच सगळ्या महिला पळाल्या

"घोसाळकर ऑफिसमध्ये पोहचल्यानंतर थोड्याच वेळात प्रवीण घाबरलेल्या अवस्थेत बाहेर आला आणि म्हणाला 'भाईला (घोसाळकर) गोळी मारली.' घोसाळकरांना गोळी मारल्याचं कळताच सर्व बायका पळाल्या. त्यांना (घोसाळकरांना) वाचवायला कोणीच पुढे येईना. प्रवीणने त्यांना धरून बाहेर आणलं. मग आम्ही त्यांना धरून रिक्षापर्यंत नेलं. परंतु, एकही रिक्षाचालक रुग्णालयात जायला तयार होत नव्हता. अखेर एका रिक्षावाल्याला आम्ही तयार केलं आणि रिक्षातून आम्ही त्यांना करुणा रुग्णालयात नेलं," असं या महिलेने सांगितलं.

मॉरिस कुठे पळाला कळलं नाही

“आधी त्यांना रुग्णालयात न्या! मग मारेकऱ्यांना शोधा असं मी त्यांना सांगत होते. या गडबडीत मॉरिस कुठे पळाला हे कळलं नाही. त्या रस्त्याला अंधार असतो त्यामुळे काहीच दिसलं नाही”, असंही या प्रत्यक्षदर्शी महिलेनं सांगितलं.

मॉरिसची आत्महत्या

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर 5 गोळ्या झाडण्यात आल्या. ANI ने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, उपचारादरम्यान अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर मॉरिसने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली.