Solar Bike : कुणाल जमदाडे / शिर्डी अहमदनगर : तरुणाने भंगारातून कमी पैशात सोलर बाईक तयार केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात राहणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा नितीन देशमुख या तरुणाने हा करिष्मा करुन दाखवला आहे. नितीन याने भंगारातून ही बाईक बनवली आहे. दुचाकीला चक्क सोलर पॅनल बसवून नवा अविष्कार घडवला आहे. अवघ्या 8000 ही सोलर बाईक तयार केली आहे. या सोलर बाईकचे सर्वत्र कौतुक होत आहे. (A solar bike made by a farmer's son)
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील गौतम इन्स्टिट्यूटमध्ये DEE च्या अंतीम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या नितीन देशमुख या शेतकऱ्याच्या मुलाने चक्क सोलर बाईक बनवली आहे. भंगारातून अवघ्या अठराशे रुपयांना घेतलेल्या इलेक्ट्रीक बाईकला त्याने सहा हजार रुपये खर्च केला आणि ही सोलर बाईक बनवली. आता त्याला इंधनाच्या खर्चा शिवाय सर्व कामे करता येत आहेत. गायी आणि जनावरांना चारा आणणे असो की डेअरीत दूध घालणं असो, सर्वकाही या सोलर बाईकवर तो काम करताना दिसतो.
नितीन देशमुख याने बनवलेली ही सोलर बाईक रस्त्याने धावताना ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. इंजिनचा आवाज नाही आणि इंधनाचा खर्चही नाही. केवळ सूर्यप्रकाश हेच या गाडीचे इंधन आहे. उन्हात कसल्याही इंधना शिवाय तो दिवसभर मोठया दिमाखात आपली ही बाईक फिरत असतो. त्याच्या या अविष्कारामुळे वडीलही आनंदी झाले आहेत. याबाबत त्याचे वडील संजय देशमुख यांनी आपल्याला खूप आनंद झाल्याचे सांगितले. मुलाने कल्पकता दाखव कमी खर्चात इंधन खर्च वाचवला आहे. त्यामुळे महागाईत मोठा दिलासा मिळाला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
नितीन देशमुख लवकरच या बाईचे पेटंट मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे. हे आगळे-वेगळे पर्यावरण पूरक पेटंट जगासमोर मांडणार आहे. नितीनची धडपड्या, खटपट्या, उचापत्या करणा तरुण अशी त्याची मित्रांमध्ये ओळख आहे. हा तरुण भविष्यात आणखी मोठे संशोधन करु शकतो, अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.