वाढदिवसाच्या पार्टीवेळी फक्त बघितले म्हणून पुण्यात जोरदार राडा

 Crime News : वाढदिवसाच्या पार्टीवेळी बघितल्याच्या रागातून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. केवळ बघितले म्हणून ही मारहाण झाली. 

Updated: Sep 27, 2022, 03:25 PM IST
वाढदिवसाच्या पार्टीवेळी फक्त बघितले म्हणून पुण्यात जोरदार राडा title=

पुणे : Crime News : वाढदिवसाच्या पार्टीवेळी बघितल्याच्या रागातून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. केवळ बघितले म्हणून ही मारहाण झाली. काही जणांनी रागाच्या भरात एकाला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. पुण्याच्या सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथे ही घटना घडली. मारहाण करणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. 

 वाढदिवसाची पार्टी सुरू असताना एकाने फक्त बघितले म्हणून त्याला सहा जणांनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. यात गणपतसिंह मेरावी ( 38  वर्षे, रा. लेबर कॅम्प धायरी पुणे, मूळ: मध्यप्रदेश) हा गंभीर जखमी झाला असून अद्यापपर्यंत तो बेशुद्ध अवस्थेत आहे. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास धायरी येथील डी.एस.के. स्कुलजवळ घडली. याबाबत जखमीचा मित्र सुकलसिंह मसराम (35 वर्षे रा. लेबर कॅम्प, धायरी, पुणे) यांनी तक्रार दिल्याने पाच जणांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुदर्शन उर्फ बाळा केशव भेगडे (42 वर्षे, रा. युवानील सोसायटी, धायरीगाव, पुणे) प्रकाश किसन कंक (45 वर्षे) सूरज उर्फ छोट्या रमेश जोयरे (22)सतीश उर्फ अण्णा चंद्रकांत केंगनाळ 24 वर्षे) दीपक उर्फ जंगल राजेंद्र गोरीवले (20) प्रणव ऊर्फ मटण संतोष कल्याणकर (19) सर्व राहणार दत्तवाडी, पुणे या सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 

सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील शाळेजवळ असणाऱ्या पत्र्याचे शेडमध्ये लेबर कॅम्प आहे. त्याठिकाणी काही मध्यप्रदेश भागातील कामगार राहतात. ते सर्वजण सेंट्रिंगची कामे करतात. लेबर कॅम्पपासून पाचशे मीटर अंतरावर सनी चव्हाण याचा वाढदिवस करण्यासाठी तेथे त्याचे काही मित्र जमले होते. यावेळी गणपतसिंह मेरावी याने त्यांच्याकडे बघितले म्हणून त्याला पाच जणांनी मिळून ठार मारण्याच्या उद्देशाने लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. यात तो गंभीर जखमी होऊन जागीच बेशुद्ध पडला. 

दरम्यान तो निपचित पडल्याचे पाहून या सहा जणांनी तेथून धूम ठोकली. याबाबत सिंहगड रस्ता पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. जखमी गणपतसिंह मेरावी याच्यावर रुग्णालयात उपचार चालू असून अद्यापही तो शुद्धीवर आला नसल्याची माहिती मिळते आहे. या घटनेत पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल त्यांना अटक केली आहे.