मुंबईत भीषण अपघात! वीजेच्या खांबाला धडकून कारचे अक्षरश: दोन तुकडे, मग प्रवाशांचं काय झालं असेल?

मुंबईतील कुर्ल्यात (Kurla) शुक्रवारी रात्री भरधाव वेगाने धावणारी कार वीजेच्या खांबाला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 2 तरुणींसह एकूण 5 जण जखमी झाले आहेत. सर्वांना जखमी अवस्थेत उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) दाखल करण्यात आलं आहे. अपघात नेमका कसा झाला याचा तपास नेहरु नगर पोलीस करत आहेत.   

शिवराज यादव | Updated: Aug 12, 2023, 10:03 AM IST
मुंबईत भीषण अपघात! वीजेच्या खांबाला धडकून कारचे अक्षरश: दोन तुकडे, मग प्रवाशांचं काय झालं असेल? title=

मुंबईतील शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. कुर्ला (Kurla) येथे भरधाव वेगाने धावणारी अर्टिगा कार वीजेच्या खांबाला धडकून हा भीषण अपघात झाला. धडक इतकी जबरदस्त होती की, कारचे अक्षरश: दोन तुकडे झाले. अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या दोन तरुणींसह एकूण 5 जण जखमी झाले आहेत. स्थानिकांनी नेहरु नगर पोलिसांच्या मदतीने जखमींना जवळच असणाऱ्या राजावाडी रुग्णालयात दाखल केलं आहे. दरम्यान अपघात नेमका कसा झाला याचा तपास नेहरु नगर पोलीस करत आहेत. 

वीजेच्या खांबाला जोरदार धडक

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ही कार चेंबूरच्या दिशेने जात होता. यावेळी ती प्रचंड वेगात होती. कार एससीएलआर ब्रीजवर पोहोचली असता चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार वीजेच्या खांबाला जाऊन धडकली. कारचा वेग इतका होता की, धडकेनंतर तिचा अक्षरश: चुराडा झाला. 

घटनास्थळाचा फोटो पाहिल्यानंतरच अपघात किती भीषण आहे याची कल्पना येते. दरम्यान, जेव्हा अर्टिगा कार खांबापासून वेगळी करण्यात आली, तेव्हा तिचे दोन तुकडे झाले होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना कार खांबापासून वेगळी करण्यासाठी तब्बल 1 तास लागला. कार पूर्णपणे खांबात अडकली होती. यानंतर आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. त्यांना तात्काळ जवळच असणाऱ्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी एकूण 5 लोक प्रवास करत होते. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.