Pune Navale Bridge Accident, पुणे : रविवारी रात्री पुण्यातील नवले पुलावर भयंकर अपघात (Pune Navale Bridge Accident) घडला होता. सात आठ नव्हे तर तब्बल 48 वाहने एकमेकांवर आदळली होती. यामध्ये सुमारे 40 ते 50 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली होती. साताऱ्याहून मुंबईच्या (Satara To Mumbai) दिशेनं जात असलेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाला. त्यानंतर चालकाचं कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने हा विचित्र अपघात घडला होता. मात्र, तपासादरम्यान या अपघाताबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे.
पुण्यातल्या नवले पुलावर झालेल्या अपघातामध्ये आता मोठा खुलासा समोर आला आहे. इंजिन बंद करून न्यूट्रलवर कंटेनर चालवल्यामुळे पुण्याच्या नवले पुलावर अपघात घडल्याचे तपासात समोर आले आहे. कंटेनरचा ड्रायव्हर अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झाल्याचं सांगितलं जात होतं. पण तपासात कंटेनरचे ब्रेक फेल नसल्याचं उघड झालंय. यात ड्रायव्हरची सर्वात मोठी चूक असल्याची माहिती आता तपासात समोर आली आहे.
कारण नवले ब्रिजजवळच्या उतारावर ड्रायव्हरने इंजिन बंद केलं आणि गाडी न्यूट्रलवर टाकली. त्यातच नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं आता तपासात समोर आले आहे. पुण्यातील नवले पूल अपघातांचा हॉटस्पॉट बनला आहे. नवले पुलावर सातत्याने वाहनांचे अपघात होत आहेत.