राज्यात कोरोना व्हायरस रुग्णांचा आकडा २६ वर

राज्यातला कोरोना व्हायरस रुग्णांचा आकडा २६ वर 

Updated: Mar 14, 2020, 08:04 PM IST
राज्यात कोरोना व्हायरस रुग्णांचा आकडा २६ वर  title=

मुंबई : राज्यातला कोरोना व्हायरस रुग्णांचा आकडा २६ वर गेलाय. यात सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात असून पुण्यातल्या कोरोना व्हायरस रुग्णांचा आकडा हा १० झालाय. तर पुण्यापाठोपाठ मुंबईत कोरोनाचे चार रुग्ण आढळले आहेत. नागपूरातल्या रुग्णांची संख्या ही चार आहे तर ठाणे आणि अहमदनगरमध्ये कोरोनाचे प्रत्येकी एक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता कोरोना व्हायरसची संख्या राज्यात 26 झाली आहे.

शाळा ३१ मार्चपर्यंत बंद

राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयं ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय शासनाने दिला आहे. यामध्ये खासगी आणि सरकारी शाळांचा समावेश असेल. असे असले तरी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरु राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

काल पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळा बंद करण्याचा निर्णय झाला होता. राज्यातील शाळा बंद करण्यासंदर्भात वारंवार मागणी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आवाहन करुनही अनेक थिएटर्स आणि खासगी क्लासेस सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा आस्थापनांवर कारवाई करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

यवतमाळमध्ये दोन रुग्ण 

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळून आलेत. दोन्ही कोरोनाचे रुग्ण दुबईला गेलेल्या गटातील सदस्य होते. १ मार्चला यवतमाळमधील नऊ जणांचा गट दुबईहून परतला होता. नऊ जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठवण्यात आले होते. यातल्या दोघांचे नमुने पॉझिटीव्ह आलेत. दोघांवरही नागपूरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.