नाशिक : मनमाडमध्ये थंडीनं गारठून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात थंडीनं पाच जणांचा बळी गेला आहे. राज्यात सर्वत्र पाऱ्यानं निचांकी गाठली आहे. बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो आहे. तापमानाचा पारा घसरल्यानं स्वाईन फ्लूची भीती व्यक्त होते आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे वापरण्याची आणि आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
दुसरीकडे मुंबईत आज सलग तिसऱ्या दिवशीही गारेगार थंडीचा अनुभव येत आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे मुंबई गारठली आहे. सकाळच्या वेळेचं तापमान १६ सेल्सियस अंशावर गेलं आहे. फेब्रुवारी महिन्यातील मुंबईतील दुसऱ्या निचांकी तापमानाची नोंदही करण्यात आली. २०१२ साली मुंबईत ८.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर मुंबईत यावेळी १२.४ अंश से. इतकं किमान तापमान नोंदवलं गेलं आहे. पुढील २४ तासांत मुंबईसह महाराष्ट्रात थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दिल्लीमध्ये पुन्हा थंडी वाढली आहे. पुढच्या 2 दिवसात आणखी थंडी वाढण्याची शक्यता आहे. येणाऱ्या 24 तासात अरुणाचल प्रदेश, उत्तर बंगाल, आसाम, बिहार, मेघालयमध्ये पावसाची शक्यता आहे. 11 आणि 13 फेब्रुवारी दरम्यान हिमाचलमध्ये बर्फवृष्टीची शक्यता आहे.
धुक्यांमुळे दिल्लीकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. विमान वाहतुकीवर देखाल याचा परिणाम पाहायला मिळता आहे. दरवर्षी वाढणारी थंडी आणि उष्णता हे ग्लोबल वॉर्मिंगच्या धोक्याचा इशारा देत आहे.