कल्याण : कल्याणमध्ये ३ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. याच पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपायोजनांसह जनजागृती करण्यात येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गेल्या ५ दिवसांत, रुग्ण सापडलेल्या परिसरात सर्व्हेक्षण सुरु करण्यात आलं आहे.
आरोग्य विभागाकडून १८ पथकं तैनात करण्यात आली आहेत. तर ४१४७ घरांमधील १७ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान ताप, सर्दी आणि खोकल्यासारख्या आजाराची लक्षणं असलेल्या १४४ रुग्णांना पालिकेच्या रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.
तसंच, या नागरिकांना कोरोनाची लक्षणं कोणती हे समजावून देत अशा प्रकारची लक्षणं आढळल्यास तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर पालिका प्रशासनासह वाहतूक पोलिसही जनजागृतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. शहरातील रहदारीच्या चौकात वाहतूक पोलिस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्यासह त्यांचे कर्मचारी नागरिकांना घाबरून न जाता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षिततेबाबत घ्यायची काळजी याबाबत जनजागृती करत आहेत.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत ४० जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यामध्ये २८ पुरूष आणि १३ महिलांचा समावेश आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच प्रवास करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. सध्या लोकल, बस बंद करण्याचा निर्णय घेतला नसल्याचं त्यांनी सांगितलंय. अनावश्यक प्रवास टाळला नाही तर, नाईलाजाने लोकल बंद कराव्या लागतील असंही ते म्हणाले.