कोरोनाग्रस्त रुग्णांची प्रकृती स्थिर, घरी सोडण्याआधी अशी प्रक्रिया होणार

परदेशातून आलेल्यांना २४ तास विलगीकरण कक्षात ठेवणार

Updated: Mar 17, 2020, 07:21 PM IST
कोरोनाग्रस्त रुग्णांची प्रकृती स्थिर, घरी सोडण्याआधी अशी प्रक्रिया होणार title=

मुंबई/पुणे : राज्यात आज दिवसभरात मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढल्याने राज्यातील रुग्णांची संख्या ४१ झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांपैकी एकाची प्रकृती गंभीर असली तरी अन्य सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

पुण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, तिथल्या कोरोनाबाधित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आणि चांगली आहे. ९ मार्चला पुण्यात जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांचे सॅम्पल २४ मार्चला पुन्हा तपासण्यासाठी पाठवले जातील. ते निगेटिव्ह आले तर २४ तासांनंतर पुन्हा तपासणी केली जाईल. या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या तर त्यांना घरी सोडलं जाईल, अशी माहिती पुणे विभागाचे महसूल आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांची ठराविक दिवसानंतर दोनदा तपासणी करून दोन्ही सॅम्पल्स निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.

परदेशातून येणाऱ्या व्यक्तिंना २४ तास विलगीकरण कक्षात ठेवणार

परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाला आता २४ तास विलगीकरण कक्षात ठेवलं जाणार असून तपासणीनंतर त्याचं पुढे काय करायचं याचा निर्णय घेण्यात येणार आहे. पुण्यातील विलगीकरण कक्षातील बेडची संख्याही वाढवण्यात आली आहे. ज्यांना घरी विलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यांनी त्याचे कठोर पालन करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल, असंही सरकारनं बजावलं आहे.

पुण्यात गेल्या २४ तासांत १८ संशयित दाखल झाले होते. त्यापैकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. १४ मार्चला तो अमेरिकेतून दुबईमार्गे भारतात आला होता. त्यामुळे पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे. तर संशयितांपैकी ३२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. पुणे विभागातील इतर चार जिल्ह्यांत २३ जणांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. पण त्यापैकी एकही कोरोना पॉझिटिव्ह नाही, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.